बीड जिल्ह्यातील सहा नगरपालिका आणि पाच नगरपंचायतीच्या नगराध्यक्षांचे आरक्षण जाहीर करण्यात आले आहे. त्यानुसार बीड नगरपालिकेचे नगराध्यक्ष पद अनुसूचित जातीच्या (एससी) महिलेसाठी राखीव झाले आहे. त्याचबरोबर अंबाजोगाई ओबीसींसाठी, धारूर सर्वसाधारण तर गेवराई आणि परळीत खुल्या गटातील महिलेसाठी राखीव ठेवण्यात आले आहे.
बीड नगरपरिषदेचे राजकीय गणित (Beed nagar parishad)
बीडच्या नगर परिषदेवर सत्ता गाजविण्यासाठी जिल्ह्यातील नेते इच्छुक असतात. बीडमध्ये अतिशय प्रबळ आणि मातब्बर असलेले राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार संदीप क्षीरसागर आणि अजित पवार गटाचे नेते, संदीप क्षीरसागर यांचे बंधू योगेश क्षीरसागर यांच्यात खऱ्या अर्थाने मोठी चुरस असणार आहे. दोन्ही गटांना निवडून येणाऱ्या अनुसूचित प्रवर्गाच्या महिलेला संधी द्यावी लागणार आहे. आरक्षण पडल्यामुळे अनुसूचित प्रवर्गातील निवडून येणारा आणि जनमाणसात नाव असलेला नवा चेहरा शोधण्याचे काम दोन्ही नेत्यांना करावे लागणार आहे.
advertisement
माजलगावात काय होणार? (Majalgaon Nagar Parishad)
मराठा आरक्षण आंदोलनात ओबीसी समुदायाच्या निशाण्यावर प्रकाश सोळंके आले होते. विशेष म्हणजे माजलगाव हे ओबीसी महिलेसाठी आरक्षित झाले आहे. त्यामुळे सोळंके यांना ओबीसी समुदायाशी जुळवून घ्यावे लागणार आहे. मराठा आरक्षणासाठी त्यांचा सक्रीय सहभाग आणि आरक्षणाच्या समर्थनार्थ केलेली वक्तव्ये पाहता ओबीसी समुदाय सोळंके यांना कसा प्रतिसाद देतो, हे पाहणे औत्सुक्याचे असेल.
अंबाजोगाईमध्ये काय होईल? (Ambajogai Nagar Parishad)
भाजपच्या आमदार नमिता मुंडदा, त्यांचे पती अक्षय मुंदडा यांचे तालुक्यावर वर्चस्व आहे. त्यांच्या विरोधात राष्ट्रवादी अजित पवार गटाचे राजकिशोर मोदी दंड थोपटून तयार आहेत. दोन्ही पक्षात अत्यंत निकराची लढाई होण्याची अपेक्षा आहे. महायुतीत कुस्ती होण्याची शक्यता आहे.
गेवराईतील राजकीय समीकरण काय? (Georai Nagar Parishad)
गेवराईत विजयसिंह पंडित विरुद्ध लक्ष्मण पवार यांच्या गटात नगराध्यक्षपदाचा सामना होईल. गेवराईत लक्ष्मण पवार गटाचा नगराध्यक्ष होता. परंतु विधानसभेला विजयसिंह पंडित निवडून आल्याने पूर्ण ताकदीनिशी पवार गटाला नमविण्याचा प्रयत्न ते करतील.
धारूरचे गणित काय? (Dharur nagar Parishad)
माजलगाव विधानसभा मतदारसंघात धारूर नगर परिषद येते. येथे ठराविक नेत्याचा प्रभाव आहे, अशी सध्या परिस्थिती नाही. त्यामुळे समोरील उमेदवार कोण आणि किती प्रबळ आहे, यावरच सारी गणिते अवलंबून असतील.
परळीत काय होणार? (Parali Nagar parishad)
राज्यातील सत्ता समीकरणे बदल्यानंतर परळीतही समीकरणांमध्ये बदल झाला. मुंडे बहीण भाऊ एकत्र आल्यानंतर आता नगर परिषद निवडणुकीत मैत्रीपूर्ण लढत होणार की अजून तिसरे समीकरण आकाराला येणार? हे पाहणे महत्त्वाचे आहे.