अशातच आता जामखेड नगरपरिषद निवडणुकीत भारतीय जनता पार्टीला दणदणीत यश मिळालं आहे. भाजपाच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार प्रांजल चिंतामणी या प्रचंड मतांनी विजयी झाल्या आहेत. या निवडणुकीत भाजपाने १५ जागांवर विजय मिळवत स्पष्ट वर्चस्व सिद्ध केलं आहे. तर राष्ट्रवादी काँग्रेसला ९ जागा आणि बहुजन वंचित आघाडीला २ जागांवर समाधान मानावं लागलं आहे. या विजयामागे भाजपाचे सभापती राम शिंदे यांचा मोठा वाटा असल्याचं बोललं जात आहे. जनतेने दाखवलेल्या विश्वासाला कधीही तडा जाऊ देणार नाही, अशी ग्वाही नवनिर्वाचित नगराध्यक्ष प्रांजल चिंतामणी यांनी दिली आहे.
advertisement
नगराध्यक्षपदासाठी उमेदवार कोण?
जामखेड नगराध्यक्ष पदासाठी राष्ट्रवादी (शरद पवार गट) यांच्याकडून संध्या शहाजी राळेभात यांना तर भाजपकडून प्रांजल चिंतामणी यांना उमेदवारी देण्यात आली होती.
सूर्यकांत मोरेंच्या भाषणाने वातावरण तापलं
जामखेड नगरपालिकेची निवडणुकीच्या प्रचारात आमदार रोहित पवार यांचे शिलेदार सूर्यकांत मोरे यांनी भाजपचे विधान परिषदेचे सभापती राम शिंदेंवर जोरदार हल्ला चढवला. राम शिंदे उडालेल्या बल्बचे सभापती, असा शब्दप्रयोग सूर्यकांत मोरे यांनी रोहित पवार यांच्या उपस्थित झालेल्या प्रचार सभेत केला. यावरून, विधान परिषदेतील भाजपच्या सदस्यांनी सूर्यकांत मोरे यांच्या टिकेची गंभीर दखल घेत हक्कभंगाची नोटिस बजावली.
पवार आणि शिंदे पुन्हा लढत
विधानसभा निवडणुकीत राम शिंदे यांचा आमदार रोहित पवार यांनी निसटता पराभव केला होता. हा पराभव राम शिंदे यांच्या चांगलाच जिव्हारी लागला होता. जामखेड तालुक्याच्या राजकारणात राम शिंदे यांनी आता चांगलेच कमबॅक केले आहे. सहकार आणि काही स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये त्यांनी आ. रोहित पवारांच्या हातातून सत्ता खेचून आणली आहे. अशातच आता नगरपरिषदेच्या निवडणुकीत त्यांनी सर्वस्व पणाला लावले. रोहित पवारांना शह देण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचीही सभा झाली.
