या हत्याकांडाला १८ महिने उलटूनही अद्याप याप्रकरणी कुणालाही अटक करण्यात आली नाही. अनेकदा तपास अधिकारी बदलण्यात आले. मात्र कोणतीही ठोस कारवाई अद्याप केली नाही. त्यामुळे मयत महादेव मुंडेंच्या पत्नी ज्ञानेश्वर मुंडे बुधवारी आक्रमक झाल्या. त्यांनी पतीच्या मारेकऱ्यांना लवकरात लवकर अटक करून कठोर कारवाई करण्याची मागणी केली. पण कारवाई होत नसल्याने त्यांनी विष प्राशन करत आत्मदहनाचा प्रयत्न केला. त्यांच्यावर सध्या बीडच्या जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
advertisement
पण महादेव मुंडे खून प्रकरणाला आता वेगळं वळण मिळालं आहे. पोलिसांनी पत्नी ज्ञानेश्वरी मुंडे यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. बीडच्या पोलीस अधीक्षकांच्या कार्यालयासमोर आत्महत्येचा प्रयत्न केल्याप्रकरणी हा गुन्हा दाखल केला आहे. हा अदखलपात्र गुन्हा आहे. एकीकडे १८ महिन्यांपासून महादेव मुंडे हत्या प्रकरणात कोणतीच कारवाई केली जात नसताना आता न्यायासाठी लढणाऱ्या ज्ञानेश्वरी मुंडे यांच्यावरच गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
महादेव मुंडे यांच्या खून प्रकरणाचा तपास जलद गतीने व्हावा, या मागणीसाठी ज्ञानेश्वरी मुंडे यांनी बीडच्या पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या आवारात विष पिऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता. या प्रकरणात त्यांच्या विरोधात बीड शहर पोलीस ठाण्यात हा अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे.. दरम्यान ज्ञानेश्वरी मुंडे यांच्यावर आता बीडच्या शासकीय रुग्णालयात उपचार सुरू असून त्यांच्या प्रकृतीत सुधारणा होत आहे. आता या सगळ्या प्रकरणावर पोलीस काय कारवाई करतात, हे पाहणं तितकंच महत्त्वाचं असणार आहे.
