यात वाल्मीक कराडची दोन्ही मुलं सुशील आणि श्रीगणेश यांनाही पोलिसांनी ताब्यात घेत त्याची १७ तास चौकशी केल्याचं समोर आलं होतं. या सगळ्या घडामोडीनंतर आता वाल्मीक कराडचा मुलगा सुशील कराड पहिल्यांदा मीडियासमोर आला आहे. त्याने आपली बाजू मांडताना महादेव मुंडे हत्या प्रकरणात सीबीआय चौकशी व्हावी, अशी मागणी केली आहे. तसेच महादेव मुंडे यांच्या पत्नी ज्ञानेश्वरी मुंडे यांच्याकडे ऑफर घेऊन कोण आलं होतं, हेही त्यांनी समोर आणावं, असं खळबळजनक वक्तव्य सुशील कराडने केलं आहे. यामुळे आता महादेव मुंडे हत्या प्रकरणाला वेगळं वळण मिळताना दिसत आहे.
advertisement
सुशील कराड नेमकं काय म्हणाला?
एका मराठी वृत्तवाहिनीशी बोलताना सुशील कराड म्हणाला की, "माझे वडील, मी आणि माझा भाऊ महादेव मुंडे यांना ओळखत देखील नव्हतो. आमची हात जोडून विनंती आहे की, या प्रकरणाची सीबीआय चौकशी करण्यात यावी. एकदा होऊनच जाऊ द्या, त्यांना काय सिद्ध करायचं आहे. त्यांच्याकडे पुरावे असतील तर आमच्याकडे देखील पुरावे आहेत. याबाबत आमचं संपूर्ण कुटुंब लवकरच पत्रकार परिषद घेऊन आमची बाजू मांडणार आहोत. यातून जे सत्य आहे ते समोर येईल."
'आमची १७ तास चौकशी झाली नाही'
१७ तास चौकशी झाल्याच्या बातमीवर बोलताना सुशील कराड म्हणाले की, "माझ्या भावाची आणि माझी कोणतीही १७ तास चौकशी झालेली नाही. तपास करणारे अधिकारी कुमावत यांच्यावर आमचा विश्वास आहे."
महादेव मुंडे खून प्रकरणातील आरोपी लवकरच परदेशात पळून जातील, या रोहित पवारांच्या दाव्यावर देखील सुशील कराडने भाष्य केलं आहे. "माझा आणि माझ्या वडिलांचा पासपोर्ट नाही. जर माझ्या भावाला पळून जायचं असतं तर तो कधीच पळून गेला असता. या प्रकरणाशी आमचा कोणताही संबंध नाही आणि आम्ही सर्व चौकशीला सामोरं जायला तयार आहोत," असं सुशील कराड म्हणाला.
'ज्ञानेश्वरी मुंडेंकडे कोण ऑफर घेऊन आलं त्याचं नाव सांगा'
ज्या व्यक्तीला आम्ही ओळखत नाही, त्याला मारण्याचा संबंधच येतो कसा? असा प्रश्न देखील सुशील कराडने विचारला. तसेच त्याने महादेव मुंडे यांच्या पत्नी ज्ञानेश्वरी मुंडे यांना उद्देशून म्हटले की, "ज्ञानेश्वरी ताई, तुमच्याकडे कोण ऑफर घेऊन आलं होतं, त्याचं नाव पुढे करा."
