बीड : विधानसभा निवडणुकीसाठी प्रचाराला सुरुवात झाली असून मतदारांना आपल्याकडे खेचण्यासाठी आता उमेदवारांकडून आश्वासनांची खैरात केली जात आहे. बीडच्या परळी मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या उमेदवारानं मतदारांना दिलेल्या आश्वासनाची सध्या चर्चा होत आहे. मी आमदार झालो तर सगळ्या पोरांची लग्नं करू असं आश्वासन त्यांनी दिलंय. शरद पवार गटाने बीड जिल्ह्यात परळी मतदारसंघात राजेसाहेब देशमुख यांना उमेदवारी दिलीय. त्यांच्या प्रचाराचा शुभारंभ करण्यात आला.
advertisement
परळी मतदारसंघातील घाटनांदुर येथे खासदार बजरंग सोनवणे यांच्या उपस्थितीत झालेल्या सभेत जर उद्याच्या काळात मी आमदार झालो तर सगळ्या पोरांचे लग्न करु असे राजेसाहेब देशमुख यांनी म्हटले असून याची जोरदार चर्चा आता जिल्ह्यात होत आहे. राजेसाहेब देशमुख म्हणाले की, परळी परिसरात तरुण पोराला नातेवाईक म्हणून येत असतांना विचारतात नोकरी आहे का, काही कामधंदा आहे का, पालकमंत्र्यांनाच येथे काही उद्योगधंदा नाही, तुमचा कुठून येणार? एकही उद्योगधंदा उभा केला नाही. यामुळे मुलांचे लग्न होणे मुश्कील झाले आहे.
सर्व पोरांना मी या ठिकाणी आश्वासन देतो. जर उद्याच्या काळात मी आमदार झालो सगळ्या पोराचे लग्न करु. सगळ्या पोरांना कामधंदा देऊ, बाबुराव तुमचं लग्न करायचंय त्यामुळे आगे बढो म्हणल्याशिवाय पर्याय नाही असे आश्वासन बीडच्या परळी मतदारसंघातील राजेसाहेब देशमुखांनी दिले असून त्यांच्या या अजब आश्वासनाची आता जोरदार चर्चा होतांना दिसत आहे.
जिल्ह्यात निष्क्रिय आणि कुचकामी पालकमंत्री आहेत. हुकमी एक्का आणि दादागिरी सुरू आहे. पोलीस निरीक्षक प्रचार करायला लागले. शिरसाळ्यामध्ये दहिफळे पोलीस निरीक्षक पक्षप्रवेश करायला लागले. त्या पोलीस अधिकाऱ्याला सांगणं आहे ड्रेस तरी काढ. पालकमंत्री निष्क्रिय आहे तर तू तरी पांढरा शर्ट घालून राजकारण करा इथून पुढच्या काळात हे चालणार नाही असंही राजेसाहेब देशमुख यांनी म्हटलं.
