लातूर : लातूरचे काँग्रेस खासदार डॉ. शिवाजी काळगे यांच्या अडचणीत वाढ झाली आहे जात प्रमाणपत्राची पूर्तता करण्याचे आदेश शिवाजी काळगे यांना उच्च न्यायालयाने दिले आहेत. शिवाजी काळगे यांना काँग्रेसने उमेदवारी दिल्यापासूनच त्यांच्या माला जंगम या जात प्रमाणपत्राची उलटसुलट चर्चा सुरू झाली होती, मात्र निवडणुकीत त्यांना या अडचणीला सामोरं जावं लागलं नाही, त्यामुळे काँग्रेसचं ट्रम्प कार्ड चाललं आणि ते विजयी झाले.
advertisement
शिवाजी काळगे यांचा विजय अनेकांच्या जिव्हारी लागला आणि औरंगाबाद हायकोर्टात तब्बल 3 याचिका त्यांच्या जात वैधता प्रमाणपत्राविरोधात दाखल केल्या गेल्या, त्यात वंचितचे उमेदवार नरसिंग उदगिरकर, बसपाचे उमेदवार विश्वनाथ आलटे आणि अनिल गायकवाड यांनी काळगेंच्या जात प्रमाणपत्राविरोधात याचिका दाखल केली. त्यापैकी वंचितच्या नरसिंग उदगीरकर यांच्या याचिकेवर सुनावणी देत उच्च न्यायालयाने डॉ. शिवाजी काळगे यांना 2 सप्टेंबरपर्यंत सर्व कागदपत्र घेऊन हजर राहण्याचे आदेश दिले आहेत.
एका मागोमाग एक अशा तीन याचिका दाखल झाल्यानंतर आणखी याचिका शिवाजी काळगे यांच्याविरोधात दाखल होण्याची चिन्ह आहेत, त्यामुळे शिवाजी काळगे यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. आता याप्रकरणी न्यायालय अंतिम निकाल काय देतं? याकडे लातूरकरांचं लक्ष लागलं आहे.
नेमकं काय आहे प्रकरण?
शिवाजी काळगे यांनी 1986 साली जात प्रमाणपत्र काढलं होतं, ते औरंगाबादच्या आयुक्तांनी रद्द केल्याची माहिती समोर येत आहे. याशिवाय जात प्रमाणपत्र देणाऱ्या अधिकाऱ्यावर कारवाई करावी, अशा सूचना तत्कालीन आयुक्तांनी दिल्याचंही सांगितलं जातं. त्यानंतर महाराष्ट्र शासनानेही काळगे यांचं जात प्रमाणपत्र रद्द केलं होतं, अशी माहिती उदगिरकर यांनी दिली आहे. लातूरचा मतदारसंघ अनुसूचित जातीसाठी राखीव असताना काळगे यांना उमेदवारी कशी दिली गेली? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. शिवाजी काळगे यांना लातूर लोकसभा मतदारसंघात 6 लाख 9 हजार 21 मतं मिळाली, त्यांनी भाजपच्या सुधाकर श्रृंगारे यांचा 61 हजार 881 मताधिक्याने पराभव केला.