एकनाथ शिंदेंना घेरलं....
मागील महायुती सरकारच्या काळात मुख्यमंत्री झाल्यानंतर रस्ते कामांबाबत एकनाथ शिंदे यांनी मोठी घोषणा केली होती. ठाकरेंना शह देण्यासाठी आणि रस्त्यांची स्थिती चांगली करण्यासाठी त्यांनी मुंबईतील सगळे रस्ते काँक्रिटचे करण्याचा निर्णय घेतला होता. आता याच पहिल्याच घोषणेवरुन एकनाथ शिंदे अडचणीत येण्याची शक्यता आहे. मुंबईतील रस्ते काँक्रिटीकरणाच्या कामात आर्थिक गैरव्यवहाराचा आरोप सातत्याने होत आहे. मुंबईतील रस्त्यांसंदर्भात दुपारी तीन वाजता विधानसभा अध्यक्ष यांच्या दालनात बैठक बोलावण्यात आली आहे.
advertisement
विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या दालनात होणाऱ्या बैठकीला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे देखील उपस्थित राहणार आहेत. त्याशिवाय, मुंबईतील सर्व आमदारांनाही बैठकीला बोलवण्यात आले आहे. आजच्या बैठकीत रस्ते कामात झालेल्या आर्थिक गैरव्यवहारांच्या आरोपांसदर्भात आर्थिक गुन्हे शाखेकडून चौकशी संदर्भात निर्णय होण्याची शक्यता आहे.
आर्थिक गुन्हे शाखेकडून चौकशी?
एकनाथ शिंदेंची कोंडी करण्याचा मुंबईतील विरोधी आणि भाजपच्या सत्ताधारी आमदारांचा प्रयत्न असल्याची चर्चा सुरू आहे. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना त्यांनी सुरू केलेल्या मुंबईतील रस्ते काँक्रिटीकरणाच्या कामांवर विरोधकांसोबत सत्ताधारी आमदारांकडून रस्त्याचा दर्जा आणि आर्थिक व्यवहाराचे आरोप सभागृहात केले आहेत. त्यावर रस्त्यांच्या कामासंदर्भात आमदारांची समिती नेमून आर्थिक गुन्हे शाखेकडून चौकशी बाबत बैठक घेऊन निर्णय करू असं विधानसभा अध्यक्षांनी याआधीच स्पष्ट केले आहे. त्यामुळे आजच्या बैठकीत त्यासंदर्भात निर्णय होण्याची शक्यता आहे.
आदित्य ठाकरे ही दिसले आक्रमक...
शिवसेना ठाकरे गटाचे आमदार, नेते आदित्य ठाकरे यांनी सातत्याने रस्त्याच्या कामात घोटाळा होत असल्याचा आरोप केला आहे. मुंबईतील रस्त्याच्या कामे पूर्णत्वास जाणार नसल्याची भीती त्यांनी व्यक्त केली होती. काही खास कंत्राटदारांवर मेहेरनजर असून त्यांच्यावर कामातील दिरंगाईवर कारवाई होत नसल्याच्या आशयाचा आरोप आदित्य यांनी केला होता.