राज्यात आज विधानसभेच्या 288 जागांवर आज मतदान पार पडत आहे. तर, दुसरीकडे पैसे वाटपाच्या आरोपात एका तरुणाला बेदम मारहाण करण्यात आली. धुळे शहरातील संभाजीनगर भागातील मतदान केंद्रावर ही घटना घडली. मतदान केंद्राबाहेर तरुणाला चोप दिल्याने काही काळ तणाव निर्माण झाला. मारहाण होत असल्याचे पाहून पोलिसांनी तात्काळ हस्तक्षेप करत तरुणाला पोलिसांनी ताब्यात घेतले.
advertisement
हा व्यक्ती कोण होता, याची माहिती समोर आली नाही. हा तरुण भाजपचा कार्यकर्ता असल्याचा आरोप करण्यात आला. मात्र, त्यावर कोणतीही पुष्टी झाली नाही. तरुणाकडे लॅपटॉप असल्याची माहिती समोर आली. या तरुणाला पोलिसांनी ताब्यात घेतले असून पुढील तपास सुरू आहे. दरम्यान, सध्या परिस्थिती पूर्णपणे नियंत्रणात असून कोणताही अनुचित प्रकार घडला नाही.
राज्यात आज मतदान
महाराष्ट्र विधानसभेच्या 288 जागांसाठी एकाच टप्प्यात मतदान होणार आहे. शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर 6 मोठे पक्ष दोन आघाड्यांचा भाग म्हणून निवडणूक लढवत आहेत. मतदानाची जय्यत तयारी करण्यात आली आहे. सकाळी 7 वाजल्यापासून मतदानाला सुरुवात झाली आहे.
या मतदानासाठी ईव्हीएम यंत्रे कडेकोट पोलीस बंदोबस्तात मतदान केंद्रांपर्यंत पोहोचवण्यात आली आहेत. या निवडणुकीत 288 मतदारसंघात एकूण 4 हजार 140 उमेदवार निवडणूक रिंगणात नशीब आजमवत आहेत. 9 कोटी मतदार मतदानाचा हक्क बजावणार असून 1 लाख 427 मतदान केंद्रावर मतदानाची व्यवस्था करण्यात आली आहे. 288 मतदारसंघातील उमेदवारांचं भवितव्य ईव्हीएममध्ये कैद होणार आहे.