राज्यातील सर्व राजकीय पक्षांचे नेते सोशल मीडिया, रोड शो आणि सभा यांद्वारे नागरिकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत आहेत. सर्व राजकीय पक्षांच्या आगामी महानगरपालिका निवडणुकींसाठी सुरू असलेला प्रचार 13 जानेवारीला सायंकाळपासून बंद होणार आहेत. त्याचवेळीपासून ड्राय डे सुद्धा लागू होणार आहे. या काळात राज्य शासनाने नागरिकांसाठी विशेष नियम जाहीर केले आहेत. ज्या महानगरपालिकेची निवडणूक होणार आहे तेथील दारूची सर्व दुकानं बंद राहतील. या नियमाचा प्रभाव महाराष्ट्रातील 29 महानगरपालिका क्षेत्रात राहील, ज्यात मुंबई, पुणे, ठाणे, कल्याण- डोंबिवली, नाशिक, नागपूर, औरंगाबाद यांसह प्रमुख महानगरपालिका समाविष्ट आहेत. याकाळात नागरिकांना सार्वजनिक ठिकाणी मद्यपान करण्यासही मनाई करण्यात आली आहे.
advertisement
ड्राय डे ठेवण्यामागे शासनाचे असे उद्दिष्ट आहे की, निवडणूकीच्या काळात शांतता, सुरक्षितता आणि अनुशासन राखणे आवश्यक आहे. मद्यपानावरील बंदीमुळे मतदारांना सुरक्षित मतदानाचे वातावरण मिळेल, तसेच निवडणुकीसंबंधी गैरप्रकार आणि दंगली टाळता येतील. दुकानदारांना ही माहिती आधीच देण्यात आली आहे. शिवाय, सार्वजनिक जागांवर पोलीस आणि प्रशासनाचे नियंत्रण वाढवले जाणार आहेत. नियमांचे उल्लंघन करणार्यांवर पोलिसांकडून कायदेशीर कारवाई केली जाईल. अशा प्रकारे 13 जानेवारीपासून 16 जानेवारीपर्यंत महाराष्ट्रातील 29 महानगरपालिकांमध्ये चार दिवसांचा ड्राय डे लागू असेल, ज्यामुळे मतदानाची प्रक्रिया सुरक्षित, शांत आणि पारदर्शक होईल, असा विश्वास प्रशासनाला आहे.
