लोकसभा निवडणुकीनंतर झालेल्या बैठकीत विधानसभेची रणनीती आखण्यात आली होती. या बैठकीत शिवसेना आणि राष्ट्रवादीनंतर भाजप जास्तीजास्त जागा लढवणार असल्याचं ठरलं होतं. तसंच कुणी कितीही जागा जिंकल्या तरी महायुतीला बहुमत मिळाल्यास एकनाथ शिंदे हेच मुख्यमंत्री राहतील असं ठरलं होतं असंही शिंदेंच्या निकटवर्तीयाने सांगितल्याची माहिती सूत्रांनी दिलीय.
भाजपकडून मात्र याबाबत वेगळी भूमिका घेण्यात आलीय. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी महायुती एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली निवडणूक लढवणार असल्याचं सांगितलं होतं. महायुतीचा नवा मुख्यमंत्री हा निकालानंतर तिन्ही पक्ष चर्चेतून ठरवतील असंही स्पष्ट केलं होतं. भाजपच्या नेत्यांनी मुख्यमंत्रिपदाबाबत सांगितलं की, नवीन मुख्यमंत्र्यांबाबत शहा यांनी स्पष्ट केलं होतं. शिंदेंना मुख्यमंत्री केलं जाईल असं ते कधीच म्हणाले नव्हते.
advertisement
राष्ट्रवादी आणि शिवसेनेकडून त्यांच्या विधीमंडळ गटनेत्यांची निवड करण्यात आलीय. पण भाजपनं त्यांच्या विधीमंडळ पक्षाची बैठकही घेतलेली नाही. भाजपच्या कार्यपद्धतीनुसार गटनेत्याची नियुक्ती केंद्रीय निरीक्षक करतात. त्यानंतरच भाजपच्या गटनेत्याच्या निवडीसाठी बैठक बोलावली जाईल.
दरम्यान, राष्ट्रवादीच्या नेत्याने मात्र मुख्यमंत्रीपदाच्या अजूनही चर्चाच सुरू असल्यानं आश्चर्य व्यक्त केलं आहे. निकालानंतर अभिनंदनाशिवाय भाजपकडून काहीच प्रतिक्रिया आलेली नाही. पुढे काय करायचंय याबद्दल निश्चित नाही. महायुतीला बहुमत मिळाल्यानंतर लवकर मुख्यमंत्री निवडतील अशी अपेक्षा होती असं राष्ट्रवादीच्या एका ज्येष्ठ नेत्यानं म्हटलंय. दुसरीकडे शिवसेनेचे नेते नरेश म्हस्के यांनी एनडीएचे नेते मुख्यमंत्री म्हणून शिंदेंच्याच नावाची घोषणा करतील असा विश्वास व्यक्त केलाय.
