उत्तर महाराष्ट्रातील जळगाव, धुळे आणि नाशिक या महापालिकांची निवडणूक जबाबदारी मंत्री गिरीश महाजन यांच्याकडे सोपवण्यात आली होती. या तिन्ही महापालिकांमध्ये भाजप सत्तास्थापनेच्या दिशेने भक्कम वाटचाल करत असल्याचे चित्र स्पष्ट होत आहे. जळगावमधील दणदणीत यशानंतर पक्षाच्या रणनीती आणि नेतृत्वावर विश्वास अधिक दृढ झाला आहे.
दरम्यान, धुळे महापालिकेत भाजप ५० पेक्षा अधिक जागांवर आघाडीवर किंवा विजयी ठरत असल्याचे संकेत मिळत आहेत. तर नाशिक महापालिकेतही भाजपने ७० हून अधिक जागांवर मजबूत कामगिरी करत सत्ता स्थापनेच्या दिशेने निर्णायक पाऊल टाकले आहे.
advertisement
या यशामुळे उत्तर महाराष्ट्रात भाजपची पकड अधिक मजबूत झाल्याचे चित्र दिसत असून, मंत्री गिरीश महाजन यांच्या नेतृत्वाखालील निवडणूक व्यवस्थापन आणि नियोजनाची राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा होत आहे.
१२ उमेदवार बिनविरोध विजयी
जळगाव महापालिका निवडणुकीत भाजप आणि शिवसेना (शिंदे गट) यांचे एकूण १२ उमेदवार बिनविरोध विजयी झाले आहेत. यामध्ये भाजपचे ६ आणि शिंदेसेनेचे ६ उमेदवार आहेत. गुरुवारी (१ जानेवारी) भाजपचा एक आणि शिंदेसेनेचे तीन उमेदवार बिनविरोध विजयी झाल्याचे स्पष्ट झाले होते. त्यानंतर अर्ज माघारी घेण्याच्या शेवटच्या दिवशी आणखी उमेदवार बिनविरोध निवडून आल्याने या संख्येत वाढ झाली.
