विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनामध्ये मंत्री छगन भुजबळ यांनी इस्लामपूरचे नाव 'ईश्वरपूर' करण्याचा प्रस्ताव केंद्र सरकारकडे पाठवण्यात आल्याचे स्पष्ट केले होते. राज्य सरकारच्या या प्रस्तावाला केंद्र सरकारने आता मान्यता दिली आहे. यामुळे सांगली जिल्ह्यातील हे शहर अधिकृतपणे 'ईश्वरपूर' या नावाने ओळखले जाणार आहे. प्रत्येक कागदोपत्री इस्लामपूरचं नाव ईश्वरपूर केलं जाणार आहे. राज्य शासनाच्या गृहमंत्रालयाने आवश्यक कागदपत्रे, प्रस्ताव आणि स्थानिक प्रशासनाच्या शिफारशीसह नामांतराचा संपूर्ण अहवाल तयार करून दिला होता. त्यानंतर काही महिन्यांच्या प्रक्रियेनंतर केंद्र सरकारकडून Survey of India या विभागाकडून मान्यता मिळाली आहे. या मान्यतेमुळे आता महाराष्ट्र सरकारकडून पुढील प्रशासकीय अंमलबजावणीची प्रक्रिया सुरू होणार आहे.
advertisement
महायुती सरकार सत्तेत आल्यापासून राज्यातील अनेक शहरे आणि जिल्ह्यांच्या नामांतराची प्रक्रिया सुरू झाली होती. यामध्ये इस्लामपूरचे नाव बदलण्याची मागणी देखील जोर धरू लागली होती, त्यानुसार महायुती सरकारने ही प्रक्रिया पूर्ण केली. महायुती सरकारने घेतलेल्या या निर्णयामुळे आता राज्यातील नामांतराच्या यादीत आणखी एका शहराची भर पडली आहे. राज्यामध्ये उस्मानाबाद अहमदनगर आणि औरंगाबाद या तीन जिल्ह्यांची नावे बदलण्यात आल्यानंतर आता चौथ्या जिल्ह्याचं नाव बदलण्यात आलं आहे. सांगली जिल्ह्यातील इस्लामपूरचं नाव सुद्धा बदलण्यात आलं आहे. इस्लामपूरचं नाव आता ईश्वरपूर असं करण्यात आलं आहे.
गेल्या अनेक वर्षांपासून सुरू असलेली स्थानिकांची मागणी आता अखेर पूर्ण झाली आहे. इस्लामपूरचं ईश्वरपूर हे नाव आता सर्व शासकीय, निमशासकीय आणि औद्योगिक नोंदणीत अधिकृतपणे लागू होणार आहे. दरम्यान, इस्लामपूर शहराचे नाव बदलून ईश्वरपूर करण्याची मागणी गेल्या अनेक वर्षांपासून सुरू आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख पंत सबनीस यांनी सर्वात प्रथम 1970 साली नामांतराची मागणी केली होती. पंत सबनीस यांच्या मते, शहराचे नाव भारतीय सांस्कृतिक आणि धार्मिक वारशासोबत सुसंगत असावे. पुढे 1986 मध्ये शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी इस्लामपूरमधील यल्लमा चौकातील जाहीर सभेत हे इस्लामपूर नव्हे, तर ईश्वरपूर आहे, असा ठाम उच्चार करत या विषयाला राजकीय दिशा दिली होती. त्यानंतर अनेक वर्षांपासून स्थानिक नागरिक, स्वयंसेवी संस्था आणि राजकीय नेते या मागणीचा पाठपुरावा करत होते. अखेर चार ते पाच दशकांपासून प्रलंबित असलेल्या मागणीला केंद्र सरकारकडून अखेर शिक्कामोर्तब मिळाले आहे.
Islampur Rename: बाळासाहेब ठाकरेंची मागणी अखेर 40 वर्षांनंतर पूर्ण झाली! सांगलीतल्या या भागाला मिळणार नवी ओळख
दरम्यान, केंद्र सरकारच्या मान्यतेनंतर आता इस्लामपूरचे नाव अधिकृतरीत्या ईश्वरपूर करण्यात येणार आहे. प्रत्येक कागदोपत्री इस्लामपूरचं नाव ईश्वरपूर केलं जाणार आहे. सर्व पातळीवर नाव बदलण्याचे निर्देश राज्य शासन लवकरच देणार आहे. नगरपरिषदेच्या वतीनेही या बदलासाठी प्रशासनिक हालचाली सुरू करण्यात आल्या आहेत. दरम्यान, या निर्णयाचे स्वागत करत स्थानिक नागरिकांनी फटाके फोडून आणि मिठाई वाटून आनंद साजरा केला. दशकानुदशकांची मागणी अखेर फळाला आली, असे मत नागरिकांकडून व्यक्त करण्यात येत आहे.
