भारतीय हवामान विभागाने दिलेल्या ताज्या माहितीनुसार, येत्या ४ ते ५ दिवसांत महाराष्ट्राच्या तापमानात मोठी वाढ होण्याची शक्यता असून उकाडा अधिक वाढणार आहे. हवामान तज्ज्ञांच्या मते, सध्या उत्तर आणि मध्य भारतात एकापाठोपाठ एक येणाऱ्या वेस्टर्न डिस्टरबन्समुळे वाऱ्यांची दिशा बदलत आहे. उत्तर भारतात सध्या कडाक्याची थंडी आणि धुक्याचे सावट असले, तरी महाराष्ट्रात मात्र याचे परिणाम वेगळ्या स्वरूपात पाहायला मिळत आहेत. अरबी समुद्राकडून येणाऱ्या उष्ण आणि बाष्पयुक्त वाऱ्यांमुळे राज्याच्या किमान तापमानात वाढ होत आहे.
advertisement
दक्षिणेकडे केरळच्या दिशेनं एक सायक्लोनिक सर्क्युलेशन तयार झालं आहे. तर 2 फेब्रुवारीला नवीन वेस्टर्न डिस्टर्बन्स तयार होण्याची शक्यता आहे. काश्मीपासून पुढे उत्तरेकडे वरच्या बाजूला एक सायक्लोनिक सर्क्युलेशन तयार झालं आहे. त्यामुळे काही भागांमध्ये ढगाळ वातावरण किंवा रिमझिम पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. ३ फेब्रुवारीपर्यंत अलर्ट दिला आहे.
येत्या ४ दिवसांत महाराष्ट्राच्या किमान तापमानात २ ते ४ अंशांची वाढ होण्याची शक्यता आहे. यामुळे रात्रीचा गारवा कमी होऊन उबदारपणा वाढेल. तापमानात वाढ झाल्यामुळे कोकण आणि मध्य महाराष्ट्रात दिवसा उकाडा जाणवेल. मात्र, ४ दिवसांनंतर तापमानात पुन्हा किंचित बदल होऊ शकतो. राज्याच्या काही भागात ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता असून, विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्राच्या सीमेवर हलक्या सरींचा अंदाज नाकारता येत नाही.
उत्तर भारतात सध्या पंजाब, हरियाणा आणि राजस्थानमध्ये दाट धुक्यामुळे 'ऑरेंज अलर्ट' देण्यात आला आहे. तिथल्या थंडीचा प्रभाव महाराष्ट्रावर पडण्याऐवजी, येथील स्थानिक बाष्पामुळे गारवा गायब होत आहे. फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात पुन्हा एकदा उत्तरेकडून येणाऱ्या थंड वाऱ्यांचा जोर वाढल्यास थंडीचा परतीचा प्रवास सुरू होईल.
