दरम्यान, हवामान विभागाने 26 ऑक्टोबरला सायंकाळी ठाणे जिल्ह्यासह इतर काही जिल्ह्यांना रेड अलर्टचा इशारा दिला आहे. ठाण्यासह जळगाव या जिल्ह्यामध्ये पुढच्या 3 तासांमध्ये मध्यम ते जोरदार पाऊस तसेच विजांच्या कडकडाटासह ताशी 30 ते 40 किमी वेगाने वादळी वारे वाहण्याची शक्यता आहे. तरी नागरिकांनी सतर्क राहावे, असा इशारा हवामान विभागाने दिला आहे. दिवाळीपासून राज्यामध्ये अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस पडत आहे. 21 ऑक्टोबरपासून राज्यामध्ये पावसाने चांगलाच धुमाकूळ घातला आहे. या अचानक आलेल्या पावसाने नागरिकांचे बरेच नुकसान झाले आहे.
advertisement
मुंबईसह आसपासच्या परिसरामधील वातावरण दुपारी ढगाळ होतं. तर दुपारनंतर मुंबईमध्ये अचानक पावसाच्या सरी कोसळल्या. सकाळी निरभ्र आकाश आणि दुपारनंतर अचानक अंशत: ढगाळ वातावरण आजच्या दिवशी मुंबईमध्ये पाहायला मिळालं. दुपारनंतर जोरदार पाऊसाच्या धारा कोसळल्या. दुपारनंतर पडलेल्या पावसामुळे काही प्रमाणात तरी का होईना मुंबईमध्ये थंड वातावरण पाहायला मिळाले. सायंकाळी ठाणे आणि जळगाव जिल्ह्यामध्ये मध्यम ते जोरदार पाऊस तसेच विजांच्या कडकडाटासह वादळी वारे वाहण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. शिवाय, नागरिकांना सतर्क राहण्याचा इशाराही देण्यात आला आहे.
