दिल्ली : विधानसभा निवडणुकीसाठी महायुतीने २८८ पैकी २६० जागा जाहीर केल्या आहेत. अद्याप उर्वरित जागांचा तिढा सुटलेला नाही. यासाठी महायुतीचे राज्यातील नेत्यांची दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यासोबत बुधवारी रात्री बैठक होणार होती. पण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पोहचू न शकल्यानं ही बैठक पुढे ढकलण्याची नामुष्की ओढावली. बैठकीसाठी राष्ट्रवादीचे नेते अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस राजधानी दिल्ली इथं रात्री दाखल झाले होते. मात्र, राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे न आल्यानं रात्री केंद्रीय गृह मंत्री अमित शहा यांच्या सोबत होणारी बैठक पुढं ढकलावी लागली.
advertisement
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना महायुतीच्या बैठकीसंदर्भात सांगण्यात आलं नव्हतं का? सांगितलं होतं तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे कसे पोहोचले नाहीत असा प्रश्न सध्या उपस्थित होत आहेत. मुख्यमंत्री शिंदे यांना महायुतीच्या बैठकीबद्दल माहिती मिळाली नसल्यानं हा गोंधळ झाल्याची माहिती सूत्रांनी दिलीय. जेव्हा ही बाब लक्षात आली तेव्हा मुख्यमंत्री शिंदे हे विमानाने गुवाहाटीहून गोव्याला निघाले होते. ते विमान प्रवासात असल्यानं त्यांना निरोप पोहोचला नाही.
गोव्याहून मुख्यमंत्री शिंदे हे सिंधुदुर्ग जिल्ह्यात कुडाळला निलेश राणे यांच्या पक्ष प्रवेशासाठी गेले. या कार्यक्रमाची मोठी तयारी केली होती आणि तो रद्द करता येणार नव्हता. याशिवाय पुन्हा दिल्लीला परतण्यासाठी उशीर झाला असता. त्यानंतर मुंबईला ते रात्री उशिरा आले.
मुख्यमंत्री शिंदे दिल्लीला जाऊ न शकल्यानं अमित शाह यांच्यासोबतची तिन्ही पक्षाच्या नेत्यांची बैठक बुधवारी रात्री झाली नाही. देवेंद्र फडणवीस, अजित पवार, प्रफुल्ल पटेल, सुनिल तकरे आणि चंद्रशेखर बावनकुळे हे बैठकीसाठी पोहोचले होते. पण मुख्यमंत्री न आल्यानं त्यांना दिल्लीतच मुक्काम करावा लागला. गुरुवारी सकाळी ही बैठक होणार असून मुख्यमंत्री शिंदे सकाळी दिल्लीत पोहोचतील.
