राज्यात शिवसेना शिंदे गट आणि भाजप यांच्यातील अंतर्गत कुरघोडी पुन्हा एकदा चव्हाट्यावर आली आहे. भाजपचे माजी खासदार कपिल पाटील यांनी थेट शिंदे गटाच्या उपनेत्यावर निशाणा साधला आहे. "राजमाता जिजामाता यांचं नाव घेऊन जर कुणी बोगस काम करत असेल, तर त्यांच्यावर कठोर कारवाई झाली पाहिजे," असा रोखठोक इशारा त्यांनी दिला आहे.
advertisement
कपिल पाटलांचा निशाणा...
भिवंडीचे माजी खासदार असलेले कपिल पाटील यांनी सांगितले की, राजमाता जिजामाता यांनी केवळ छत्रपती शिवाजी महाराजच नव्हे तर उभा महाराष्ट्र घडवण्याचे काम केले आहे. त्यामुळे त्यांच्याबद्दल प्रत्येकाच्या मनामध्ये आदराचे, श्रद्धेचे स्थान आहे. मात्र एखादी ठेकेदार संस्था या जिजामाता यांचे नाव वापरून भ्रष्टाचार, बोगस काम करत असतील तर त्यांना हे नाव वापरू न देण्यासाठी राज्य सरकारने कार्यवाही केली पाहिजे अशी मागणी करत पाटील यांनी जिजाऊ संघटना आणि या संस्थेचे प्रमूख तथा शिंदे गटाचे उपनेते निलेश सांबरे यांच्या कारभारावर नाव न घेता ताशेरे ओढले.
रस्त्याच्या दुर्दशेबाबत पत्रव्यवहार...
बहुचर्चित भिवंडी-वाडा रस्त्याच्या झालेल्या दुर्दशेमुळे आतापर्यंत 21 जणांचा मृत्यू झाला आहे. काहींना अपंगत्व आले आहे. अनेक सामाजिक संस्थांनी या रस्त्याच्या दुरावस्थेविरोधात आंदोलनेही केली आहेत. तसेच या सर्व कारभाराबाबत आपण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पत्रव्यवहार केला असून योग्य वेळी त्याची चौकशी सुरू होईल असा सूचक इशाराही कपिल पाटील यांनी यावेळी दिला. कपिल पाटील यांनी याआधीदेखील निलेश सांबरे यांच्यावर टीका केली आहे.
निलेश सांबरेंचा भाजपला धसका?
निलेश सांबरे यांनी भिवंडी लोकसभा मतदारसंघातून मागील लोकसभा निवडणूक अपक्ष म्हणून लढवली. त्यांना 2,31,417 मते मिळाली. तर, भाजपच्या कपिल पाटील यांचा 66 हजारांच्या मताधिक्यांनी राष्ट्रवादी शरद पवार गटाचे उमेदवार सुरेश म्हात्रे यांनी पराभव केला. काही दिवसांपूर्वीच निलेश सांबरे यांनी शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला. त्यांना उपनेते पद देण्यात आले आहे. त्यानंतर आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सांबरे हे चांगलेच सक्रिय झाले आहेत. तर, दुसरीकडे आता कपिल पाटील यांच्याकडून टीकेचे बाण सुरू आहेत.
