डॉक्टर युवतीने आत्महत्या केली की तिची हत्या झाली हा तपास होणे गरजेचे आहे, त्यासाठी सरकारकडे विशेष पोलीस पथकाची मागणी केली जात होती. मात्र सरकारने कुटुंबियांच्या तोंडाला पाने पुसली, असे शेख म्हणाले.
डॉक्टर तरुणीचा मृत्यूआधी छळ झाला, आता न्याय मिळवण्यासाठीही झुंजावे लागत आहे. तेजस्वी सातपुते यांच्या देखरेखीखाली तपास होईल, असे पत्र काढून शब्दांचा खेळ केला आहे. देवाभाऊ तुम्ही कोणाला वाचवताय? कशामुळे विशेष पोलीस पथक स्थापन करत नाही? असाही प्रश्न मेहबूब शेख यांनी विचारला. निवृत्त न्यायाधीश आणि महिला आयपीएस आधिकाऱ्याच्या देखरेखीखाली तपास होणे अपेक्षित आहे, असे शेख म्हणाले.
advertisement
विशेष पोलीस महासंचालकांनी काढलेल्या पत्रात नेमके काय म्हटले आहे?
डॉक्टर तरुणीच्या आत्महत्येबाबत दाखल गुन्ह्याच्या तपासावरील देखरेखीबाबत राज्य शासनाने एक पत्रक काढले आहे. यात त्यांनी म्हटले आहे, सदर गुन्ह्यामध्ये पोलीस खात्यातील एक पोलीस उपनिरीक्षक आरोपी असून सदर प्रकरण अतिशय संवेदनशील बनलेले आहे. तरी सदर प्रकरणाच्या तपासावर योग्य पद्धतीने देखरेख होणे गरजेचे असल्याने श्रीमती तेजस्वी सातपुते (समादेशक, रा.रा.पो.बल गट क्र.०९, पुणे) यांना या गुन्ह्याच्या तपासावर देखरेख करण्यासाठी या आदेशाद्वारे नियुक्ती करण्यात येत आहे. श्रीमती तेजस्वी सातपुते यांनी तात्काळ सातारा येथे जाऊन सदर गुन्ह्याबाबत पोलीस अधीक्षक, सातारा आणि तपासी अधिकारी यांचेकडून सविस्तर माहिती घ्यावी तसेच गुन्ह्याचा पुढील तपास योग्य पध्दतीने आणि कालमर्यादेत होईल हे सुनिश्चित करावे. त्याचबरोबर गुन्ह्याच्या तपासाचा प्रगती अहवाल वेळोवेळी कार्यालयास सादर करावा, असे आदेश त्यांना देण्यात आले आहेत.
