स्व. अजित पवार यांना पिंपरी चिंचवड शहरवासियांच्या वतीने श्रद्धांजली वाहण्यासाठी शोकसभा आयोजित करण्यात आली होती. या शोक सभेमध्ये भारतीय जनता पक्षाचे भोसरी विधानसभेचे आमदार महेश लांडगे यांनी अजित पवार यांच्या प्रतिमेसमोर हात जोडून आपल्या चाळीस सेकंदाच्या भाषणामध्ये त्यांना श्रद्धांजली अर्पण करत दादा मला माफ करा असे म्हणत मंचावरून निघून गेले.
advertisement
पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये अजित पवार विरुद्ध महेश लांडगे असे युद्ध पाहायला मिळाले होते. अजित पवारांवर केलेली टीका आणि एकेरी उल्लेख त्यांच्या जिव्हारी लागला होता. तो मोठा नेता आहे, माझा एकेरी उल्लेख करणारच, असे म्हणत अजित पवार यांनी महेश लांडगे यांच्यावर पलटवार केला होता. पिंपरी चिंचवड शहराच्या विकासावरून दोन्ही नेत्यांमध्ये जोरदार आरोप प्रत्यारोपांच्या फैरी रंगल्या. मात्र अजित पवार यांच्या शेवटच्या काही दिवसांत त्यांना आपण एकेरी बोललो, याची बोच महेश लांडगे यांना लागून राहिलेली आहे. केवळ ४० सेकंदाच्या भाषणात त्यांनी दादा मला माफ करा म्हणत झालेल्या चुकीची क्षमा मागितली.
पैलवान लांडगे अजित पवारांच्याच तालमीत तयार झाले
पैलवान महेश लांडगे हे खरे तर अजित पवार यांच्याच राजकीय तालमीत तयार झाले होते. पिंपरी चिंचवड शहर उभे राहत असताना गावपुढाऱ्यांना सोबत घेऊन अजित पवार यांनी बेरजेच्या राजकारणाची मुहूर्तमेढ रोवली. भोसरीतून महेश लांडगे यांना अजित पवार यांनी मोठी ताकद दिली. आधी नगरसेवक आणि नंतर स्थायी समितीचे अध्यक्षपदही दिले. महेश लांडगे तीन वेळा राष्ट्रवादीतून नगरसेवक झाले. याचाच अर्थ अजित पवार यांच्या मार्गदर्शनात महेश लांडगे यांच्या राजकीय कारकीर्दीची सुरुवात झाली. पुढे विधानसभेच्या उमेदवारीवरून अजित पवार यांच्याशी त्यांचे मतभेद झाले आणि २०१४ त्यांनी अपक्ष म्हणून निवडणूक लढवली. त्यानंतर तीन वर्षांनी त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. पुढे त्यांनी अजित पवार यांच्याशी उघडपणे संघर्ष पुकारला.
