महापालिका निवडणुकांची घोषणा झाल्यापासून अजित पवार पुणे जिल्ह्यात ठाण मांडून बसले होते. त्यांनी पुणे महानगरपालिका आणि पिंपरी चिंचवड महानगर पालिकेसाठी सगळी ताकद पणाला लावली होती. यासाठी त्यांनी शरद पवार गटासोबत देखील युती केली होती. पण या दोन्ही महानगर पालिकेत अजित पवारांना धक्का बसला आहे. इथं दोन पैलवानांनी त्यांना ख्वाडा डाव टाकून दोन्ही महापालिका हातून हिसकावल्या आहेत.
advertisement
हे दोन पैलवान म्हणजे महेश लांडगे आणि मुरलीधर मोहोळ. अजित पवारांनी दोन्ही पैलवानांना खुलं आव्हान दिलं होतं. महेश लांडगे नासका आंबा, भारंदाज डाव टाकून फिरवून फेकून दिला नाही तर पवारांची औलाद नाही, असं विधान अजित पवारांनी केलं होतं. शिवाय त्यांनी लांडगे यांच्यावर पालिकेत भ्रष्टाचार केल्याचा देखील आरोप केला होता. मी ठरवलं तर एखाद्याचा कार्यक्रम करतो, असंही अजित पवार म्हणाले होते. यावरून महेश लांडगे यांनी देखील अजित पवारांचा एकेरी उल्लेख करत टीका केली होती.
“1991 साली तुला कोण ओळखत होतं? चुलते नसते तर तुला कोण ओळखलं असतं? तू कार्यक्रम करतोस म्हणतोस, तर मी काय बांगड्या घातल्या आहेत का? आमच्या लाडक्या रणरागिणी, म्हणजेच लाडक्या बहिणी तुझा कार्यक्रम करतील”, असा घणाघात महेश लांडगे यांनी केला होता. हीच बाब मुरलीधर मोहोळांबाबत होती. पुणे महापालिकेच्या मागील निवडणुकीत अजित पवारांनी मोहोळांना हरवण्यासाठी चंद्रकांत पाटलांशी हात मिळवणी केल्याचं बोललं जातं. पण आता या दोन्ही पैलवानांनी अजित पवारांना ख्वाडा टाकला आहे.
पुण्यात भाजपनं ९० जागा जिंकल्या आहेत. शिंदे गटाने २ तर अजित पवार गटाला अवघ्या २० जागा जिंकता आल्या. इथं काँग्रेस ८ जागांवर विजयी झाली तर २ जागांवर ठाकरे गटाला यश मिळालं. दुसरीकडे, पिंपरी चिंचवडमध्ये देखील महेश लांडगेंनी विजय खेचून आणला. इथं भाजपला सर्वाधिक ८३ जागा मिळाल्या, ७ जागांवर शिवसेना शिंदे गटाचा विजय झाला. तर ३७ जागांवर अजित पवारांना विजय मिळवता आला आहे. एकूणच अजित पवारांना दोन पैलवानांनी ख्वाडा डाव टाकला असून दोन्ही महापालिका हिसकावून घेतला आहे.
