माळेगावात नगराध्यक्षपदासाठी एकूण १० उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत. साखर कारखान्याच्या निवडणुकीत अजित पवार आणि रंजन तावरे यांचे टोकाला गेलेले संबंध मात्र पुर्नप्रस्थापित झाले आहेत. नगरपंचायत निवडणुकीत दोन्ही नेत्यांनी जुळवून घेतले आहे. पवार-तावरे यांच्या पॅनेलसमोर शरद पवार यांच्या राष्ट्रवादीच्या पॅनेलचे आव्हान आहे.
नितीन तावरे यांना मारहाण, पोलिसांनाकडून गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू
advertisement
निवडणुकीची रणधुमाळी सुरू असताना शरद पवार गटाचे शहराध्यक्ष तसेच माळेगाव नगरपंचायतीचे उमेदवार नितीन तावरे यांना मारहाण झाल्याने शहरात तणावपूर्ण वातावरण आहे. सदर मारहाणीची तक्रार पोलिसांकडे देण्यात आली आहे. सदर घटनेसंदर्भात गुन्हा दाखल करून अधिक माहिती देण्यात येईल, असे पोलिसांनी सांगितले. मारहाणीचे कारण अद्याप अस्पष्ट असले तरी राजकीय कारणांतूनच मारहाण झाल्याचे सांगितले जाते.
नितीन तावरे रुग्णालयात दाखल
नितीन तावरे यांना झालेल्या मारहाणीत ते जखमी झाले आहेत. उपचारासाठी त्यांना जवळच्या खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहेत. पोलीस त्यांचा जबाब घेऊन गुन्हा दाखल करणार असल्याचे सांगण्यात आले.
निवडणूक लढवित असल्याचा राग मनात ठेवून हल्ला, सुप्रिया सुळे यांचे ट्विट
बारामती तालुक्यातील माळेगाव बु. नगरपंचायतीची निवडणूक लढवित असल्याचा राग मनात धरुन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे शहराध्यक्ष नितीन तावरे यांच्यावर समाजकंटकांनी प्राणघातक हल्ला केला. लोकशाही प्रक्रियेत निवडणूक लढविणे हा नागरीकांचा अधिकार आहे. या अधिकारावरच आक्रमण करुन नागरीकांचा आणि विरोधी पक्षाचा आवाज बंद करण्याचा प्रकार अतिशय संतापजनक आणि दुर्दैवी आहे. आम्ही सर्वजण या भ्याड हल्ल्ल्याचा निषेध करतो. माझी शासनाला विनंती आहे की कृपया हा हल्ला करणाऱ्यांवर कठोरात कठोर कारवाई करावी. नीतीन तावरे हे या हल्ल्यात जखमी झाले आहेत, ते लवकरात लवकर बरे व्हावे ही ईश्वरचरणी प्रार्थना, असे ट्विट खासदार सुप्रिया सुळे यांनी केले आहे.
