मनोज जरांगे पाटील यांनी आज माध्यमांशी संवाद साधताना समाज बांधवांनादेखील आवाहन केले. पत्रकार परिषदेत म्हटले की, या ठिकाणी असलेली गर्दी समजू नये तर वेदना समजावी. आम्हाला मुंबईतील श्रीमंत आणि गरीब सगळे जण मदत करत आहे. जे कोण महाराष्ट्रातून इकडे येत आहेत त्यांनी वाशी, मशीद बंदर आणि इतर ठिकाणी आपली वाहने पार्किंग करावी. इथं वाहनांना जागा नाही, असेही त्यांनी सांगितलं.
advertisement
जे जे जेवण वाटप करत आहेत. त्यांना सांगतो तुम्ही काय ते वाटप करत या. पण, थेट ट्रक इथे आणू नका. अन्नछत्र सुरू केले आहे त्यासाठी पैसे मागू नका. गरीबाचे पैसे खाऊ नका. रेनकोटच्या नावाखाली पैसे मागू नका असेही आवाहन त्यांनी केले.
मनोज जरांगेंची राज ठाकरेंवर टीकास्त्र...
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर टीका केली. राज ठाकरे कुचक्या कानाचे असून मानाचे भुकेले आहेत. मनोज जरांगे यांनी म्हटले की, कालच विषय झाला. राज्यातल्या समाजाचं म्हणणं आहे की, ते दोघे भाऊ चांगले आहेत. ब्रँड चांगला आहे. पण, हा विनाकारण मराठ्यांच्या प्रश्नांमध्ये पडतो. ह्याचा गेम केला. ह्याच्या पोराला त्यांनी (भाजप) पाडलं. राज ठाकरे म्हणजे मानाला भुकालेलं पोरगं आहे. त्याच्या घरी फडणवीस चहा पिऊन गेला सगळा पक्ष बरबाद झाला तरी त्याला चालतं. आमच्या खेड्यात याला कुचक्या कानाचं म्हणतात, असे जरांगे पाटलांनी सांगितले.
राज ठाकरेंनी काय म्हटले होते?
मुंबईतील मराठा आरक्षण आंदोलनाबाबत राज ठाकरे यांना शनिवारी माध्यमांनी विचारणा केली होती. त्यावर बोलताना राज ठाकरे यांनी म्हटले की, मराठा मोर्चा आणि आरक्षणाबाबत सर्व गोष्टींची उत्तरं एकनाथ शिंदेच देऊ शकतील. एकनाथ शिंदे मागच्यावेळी नवी मुंबईत गेले होते, त्यावेळी त्यांनी प्रश्न सोडवला होता ना, मग हे परत का आले, या प्रश्नांची सगळी उत्तरं एकनाथ शिंदे देतील, असे राज ठाकरे यांनी म्हटले.