मराठा आरक्षणाच्या मुद्यावर मनोज जरांगेंच्या नेतृत्वात आझाद मैदानात आमरण उपोषण सुरू झाले आहे. आज उपोषण आंदोलनाचा चौथा दिवस आहे. जरांगे यांना पाठिंबा देण्यासाठी राज्यभरातून हजारो लोक मुंबईत दाखल झाले आहेत. मागील 3 दिवसांत मोठ्या प्रमाणावर मराठा आंदोलक रस्त्यावर उतरले आहेत. आंदोलकांच्या प्रचंड संख्येमुळे मुंबई सीएसएमटी, मुंबई महापालिका परिसरात वाहतूक कोंडी झाली. मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाविरोधात दाखल करण्यात आलेल्या याचिकेवर 9 सप्टेंबर रोजी सुनावणी होणार होती. आज हायकोर्टात या आंदोलना विरोधात तातडीने सुनावणी झाली.
advertisement
वकील गुणरत्न सदावर्ते यांनी जरांगेंच्या आंदोलनाला देण्यात आलेली परवानगी रद्दबातल करण्याची मागणी केली आहे. जरांगे यांच्या आंदोलनामुळे मुंबईत रहदारीचा प्रश्न उपस्थित झाला असल्याचे त्यांनी म्हटले.सीएसएमटी हा महत्त्वाचा परिसर आहे. दुसरीकडे महाअधिवक्त्यांनी सरकारची बाजू मांडताना महत्त्वाची माहिती कोर्टाला दिली.
हायकोर्टात सरकारने काय म्हटले?
सरकारची बाजू मांडणारे, महाधिवक्ता अॅड. वीरेंद्र सराफ यांनी सांगितले की, आंदोलन आझाद मैदानातच आंदोलन करू शकतात बाहेर रस्त्यावर फिरू शकत नाही. राज्य सरकारने कायदा सुव्यवस्था तसेच जनभावनेचा विचार करूनच परवानगी दिली होती. मात्र मराठा आंदोलकांकडून विविध नियमांचे उल्लंघन झाल्याचे अॅड. सराफ यांनी म्हटले. त्यांनी म्हटले की, आमरण उपोषणाला सरकार परवानगी देत नाही. आता त्यांनी आमरण उपोषण सुरू केले आहे. जरांगे यांना आंदोलनासाठीच्या अटी-शर्तीचे उल्लंघन झाले आहे. जरांगे यांनी आपण अटी-शर्तीचं पालन करू असे म्हटले होते. मात्र, तसे झाले नाही. शनिवार-रविवारी करण्यात आलेले आंदोलन हे परवानगीशिवाय झालं असल्याची माहिती महाधिवक्त्यांनी दिली.
गणेशोत्सवात कायदा आणि सुव्यवस्था सांभाळणं पोलिसांसाठी देखील कठीण आहे. तरी आम्ही समतोल पाळण्याचा प्रयत्न करतोय जेणेकरून कायदा आणि सुव्यवस्था बिघडणार नाही. शनिवारी आणि रविवारी आंदोलनाला परवानगी देण्यात आलेली नाही. केवळ पाच हजार आंदोलकांना परवानगी देण्यात आली होती. मात्र, त्याहून अधिक आंदोलक जमा झाले होते.