बीड शहरातील एका खासगी रुग्णालयात एका रुग्णाला भेटायला जरांगे पाटील आणि त्यांचे सहकारी गेल्यानंतर खाली उतरत असताना ही घटना घडली. सुदैवाने या अपघातात कुणालाही मोठी दुखापत झाली नाही. दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास हा अपघात घडला. मनोज जरांगे यांच्यासह त्यांच्या सोबत असलेले सहकारी सुरक्षित असल्याची माहिती मिळत आहे.
मनोज जरांगे हे पहिल्या मजल्यावर होते. त्यांच्या सहकाऱ्यांसमवेत ते तळमजल्यावर यायला निघाले. यासाठी ते लिफ्टमध्ये बसले, परंतु तांत्रिक कारणांनी लिफ्टचा अपघात होऊन थेट जमिनीवर कोसळली. लिफ्टचा मोठा आवाज झाल्याने इतर लोकांनी तळमजल्याकडे धाव घेतली. यावेळी जरांगे आणि त्यांच्या सहकाऱ्यांना लिफ्टचे दरवाजे तोडून बाहेर काढण्यात आले.
advertisement
मनोज जरांगे पाटील यांचे दौरे सुरूच
मराठा आरक्षण मिळविण्यासाठी नेते मनोज जरांगे पाटील यांचे महाराष्ट्रात दौरे सुरूच आहे. बीड, जालना, धाराशिव, अहमदनगर जिल्ह्यात विविध कार्यक्रमांना ते सध्या हजेरी लावत आहेत. लवकरच आरक्षण आंदोलनासाठी मुंबईच्या दिशेने निघणार असल्याची घोषणा त्यांनी काही दिवसांपूर्वी केली. आरक्षण घेतल्याशिवाय आता मुंबईवरून माघारी फिरायचे नाही, असा निर्धार त्यांनी व्यक्त केला आहे. गेल्या दोन महिन्यांपूर्वी जरांगे पाटील यांनी त्यांच्या मूळगावी अंतरवाली सराटी येथे आंदोलन केले होते. चार दिवसांच्या उपोषणानंतर सरकारकडून त्यांना आश्वासन मिळाले, ज्यानंतर त्यांनी उपोषण स्थगित केले.
