मुंबई पोलिसांनी जरांगे यांच्या उपोषण आंदोलनाला पुढील काही दिवस परवानगी दिली असली तरी दररोज अर्ज करण्याची सक्ती घातल्यामुळे जरांगे संतप्त झाले आहेत. रोज परवानगीसाठी अर्ज करावा लागणार असल्याने आंदोलनकर्त्यांवर प्रशासकीय ताण वाढला असून, यावरून जरांगे यांनी थेट पोलिसांना थेट सवाल केला आहे.
'कोणता कायदा रोज अर्ज करण्यास सांगतो?', जरांगेंचा सवाल
advertisement
मनोज जरांगे यांचे वकील आशिषराजे गायकवाड आणि समर्थक पांडुरंग तारक यांनी आज मुंबई पोलिसांकडे नवा अर्ज दाखल केला. या अर्जात त्यांनी स्पष्ट सवाल उपस्थित केले आहेत. पहिल्याच अर्जात बेमुदत आणि आमरण उपोषणाची सविस्तर माहिती दिलेली असताना रोज अर्ज देण्याची सक्ती का करण्यात आली आहे? असा प्रश्न त्यांनी विचारला आहे. याचबरोबर “कोणता कायदा रोज अर्ज करण्यास सांगतो?”, तसेच “सुट्टीच्या दिवशी उपोषण करू नये, हे कोणत्या कायद्यात आहे?” असे सवाल जरांगेंनी उपस्थित केले आहे.
जरांगेनी कोणते सवाल उपस्थित केले?
- रोज अर्ज देण्याची सक्ती का करण्यात आली आहे?
- कोणता कायदा रोज अर्ज करण्यास सांगतो?
- सुट्टीच्या दिवशी उपोषण करू नये, हे कोणत्या कायद्यात आहे?
पुढील आंदोलनासाठी हाच अर्ज ग्राह्य धरावा
जरांगेंनी सवाल उपस्थित करत पोलिसांकडे आजच्या अर्जात ठाम मागणी केली आहे की, पुढील आंदोलन आणि उपोषणाच्या कालावधीकरता हाच अर्ज ग्राह्य धरावा. रोज रोज परवानगीसाठी धावाधाव करून आंदोलन कमकुवत करण्याचा प्रयत्न होत असल्याचा त्यांचा सूर होता.
प्रशासकीय पेच अधिकच चिघळण्याची शक्यता
सरकारशी चाललेल्या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर हा प्रशासकीय पेच अधिकच चिघळण्याची शक्यता आहे. उपोषणाला परवानगी दिल्यानंतर पोलिसांच्या अटींमुळे जरांगे पाटील आणखी आक्रमक होत असल्याचे चित्र आहे. दररोज अर्ज करण्याच्या सक्तीमुळे आंदोलनकर्त्यांचा संयम सुटत चालला असून, कायदा आणि प्रशासनाच्या नावाखाली आंदोलनाचे गळे घोटण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप समर्थक करत आहेत.
दररोज परवानगीच्या अटीवरून नवा संघर्ष
मुंबई पोलिसांच्या भूमिकेवरून जरांगे गटातील नाराजी चव्हाट्यावर आली असून, पुढील काही दिवसांत हा वाद आणखी तीव्र होण्याचे संकेत मिळत आहेत. दररोज परवानगीच्या अटीवरून उभा राहिलेला हा संघर्ष, सरकार–पोलिस आणि आंदोलनकर्त्यांमध्ये नवे वादळ निर्माण करण्याची चिन्हे आहेत.
हे ही वाचा:
'रोज पोलीस स्टेशनची पायरी चढा'; मनोज जरांगेच्या डोक्याला शॉट देण्यासाठी मुंबई पोलिसांची नवी खेळी