जालना, 29 ऑक्टोबर : मराठा आरक्षणासाठी मागच्या पाच दिवसांपासून उपोषणाला बसलेल्या मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती खालावत चालली आहे, त्यातच जरांगे पाटील यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दोन दिवसांमध्ये चर्चेला यायचा आग्रह केला आहे. 'फडणवीस यांनी दोन दिवसात माझ्याशी चर्चा करण्यासाठी अंतरवालीत यावं, मला बोलता येतं तोपर्यंतच यावं, तुम्हाला कुणीही त्रास देणार नाही. उलट तुमच्या गाड्यांना संरक्षण देऊ,' असा आग्रह मनोज जरांगे पाटील यांनी धरला आहे.
advertisement
फडणवीसांचं जरांगे पाटलांना आवाहन
मनोज जरांगे पाटील यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर विश्वास ठेवावा, आम्ही मराठा आरक्षणाचा निर्णय घेणार आहोत, असं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हणलं आहे. मनोज जरांगे यांनी तब्येतीची काळजी घेतली पाहिजे, डॉक्टरांची टीम तिकडे हजर असून त्यांचा जीव महत्त्वाचा असल्याचं फडणवीसांनी नमूद केलं आहे. त्यांच्यासोबत जे लोक आहेत त्यांनीही त्यांची काळजी घेण्याची आवश्यकता आहे. स्वत: मुख्यमंत्री या विषयात लक्ष घालून आहेत आणि योग्य निर्णय झाले पाहिजेत असा प्रयत्न मुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून चालला आहे, त्यामुळे त्यांनी मुख्यमंत्र्यांवर विश्वास ठेवला पाहिजे, असं आवाहन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जरांगे यांना केलं आहे.
जरांगेंचा आरोप
मराठा आरक्षणाचं श्रेय कुणी घ्यायचं यावरून मराठा आरक्षण लटकलं असून यांच्यात श्रेयवादावरून भांडण सुरू असल्याचा आरोपही मनोज जरांगे पाटील यांनी सरकारवर केला आहे. आरक्षण द्या नाही तर मराठ्यांशी लढा, हे दोनच पर्याय सरकारसमोर आहेत. दुसऱ्या टप्प्यात शांततेत आंदोलन सुरूच असून आंदोलनाचे किती टप्पे आहेत, हे आम्हालाच माहिती आहे, असंही जरांगे म्हणाले. गावात नेत्यांना येऊ नका, सगळ्यात गावात आरक्षण मिळेपर्यंत साखळी उपोषण सुरूच राहिल, असा इशाराही जरांगे पाटील यांनी दिला आहे.
डॉक्टर म्हणतात, किडनीवर परिणाम होईल, मला काही झालं तर समाज आंदोलन करेल, मला काही होऊ द्यायचं नसेल तर आरक्षण द्या, माझं हृदय बंद पडलं तर सरकारचं हृदय बंद पडेल, असा इशारा जरांगे पाटील यांनी दिला आहे.
उपचार घेण्यास नकार
नारायण गडाचे शिवाजी महाराज नारायणगडकर यांनी मनोज जरांगे पाटील यांची भेट घेऊन मनोज जरांगे पाटील यांनी पाणी आणि उपचार घेण्याची विनंती केली, मात्र जरांगे पाटील यांनी पाणी आणि उपचार घेण्यास नकार दिला. मी समाजाच्या कल्याणासाठी कठोर भूमिका घेत असून गडाचा मी नेहमीच आदर केला असल्याचंही जरांगे पाटील यांनी स्पष्ट केलं.
