मुंबई: मराठा आरक्षणाच्या मुद्यावर आझाद मैदानात मनोज जरांगे यांनी बेमुदत उपोषण पुकारले आहे. आज आमरण उपोषणाचा पाचवा दिवस आहे. सोमवारी हायकोर्टात या आंदोलनावर झालेल्या सुनावणीनंतर प्रशासन आणि मुंबई पोलीस अॅक्शन मोडवर आले आहेत. आज हायकोर्टात पुन्हा सुनावणी होणार असून त्याआधी मुंबई पोलिसांनी जरांगे पाटील यांना नोटीस बजावली आहे.
advertisement
हायकोर्टाने आझाद मैदान वगळता दक्षिण मुंबईतील इतर ठिकाणे रिकामी करण्याचे आदेश मुंबई पोलिसांनी दिले. त्याशिवाय, वाहतुकही सुरळीत करण्याचे आदेश दिले. हायकोर्टाच्या निर्देशानंतर मराठा आंदोलकांनी आपली वाहने हटवण्यास सुरुवात केली आहे. तर, दुसरीकडे आझाद मैदानात आंदोलनाची तयारी सुरू झाली आहे.
हायकोर्टातील सोमवारी झालेल्या निर्देशानंतर रात्री उशिरा आझाद मैदान पोलिसांनी मनोज जरांगे पाटील यांच्या कोअर कमिटीला नोटीस बजावली आहे. अटी आणि शर्तींचे उल्लंघन केल्याने मुंबई पोलिसांनी नोटीस बजावली आहे.
जरांगे पाटील यांनी मुंबईतील परिस्थितीबाबत भाष्य इशारा दिला होता. त्याची दखल पोलिसांनी घेतली आहे. इतर सर्व परवानगी नाकारण्यात आली आहे. आंदोलनाला कोणतीही मुदतवाढ देण्यात आली नसून आझाद मैदान रिकामं करण्याची नोटीस बजावण्यात आली आहे.
आंदोलकांची हुल्लडबाजी भोवली...
मराठा आंदोलकांनी मुंबई छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस स्थानक, मुंबई महापालिकेसमोरील रस्त्यांवर कबड्डी, क्रिकेट सारखे खेळले. यामुळे वाहतूक विस्कळीत झाली होती. त्याशिवाय, काही ठिकाणी आंदोलकांकडून अरेरावीचे प्रकार घडले. बेस्ट बसमधील प्रवाशांना मारहाण केल्याची घटना समोर आली. या सगळ्या घडामोडींची दखल मुंबई पोलिसांनी घेतली. जरांगे यांच्या कोअर टीमला पाठवलेल्या या नोटीसमध्ये मागील चार दिवसात झालेल्या घटनांचा उल्लेख करण्यात आला आहे. एक दिवसीय आंदोलनाला दिलेल्या अटी-शर्तीचे उल्लंघन झाल्याने आता आझाद मैदान रिकामं करण्याची नोटीस मुंबई पोलिसांनी जारी केले आहेत.