सातारा : राज्यात सध्या बिबट्या आणि भटक्या कुत्र्यांनी उच्छाद मांडला आहे. मानवी वस्तीमध्ये बिबट्याचे हल्ले वारंवार घडत आहे. तर दुसरीकडे शहरी भागात भटक्या कुत्र्यांचे हल्लेही वाढत आहे. अशातच सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल झालाय. या व्हिडीओमध्ये एक तरुण हा एखाद्या प्राण्यासारखा रस्त्यावर गुडघ्यावर चालत आहे, त्याला कुत्र्याने चावा घेतल्यामुळे रेबिज झाला असावा, असं सांगितलं जात होतं. पण, या व्हिडीओतील तरूण हा मनोरुग्ण असल्याचं उघड झालं आहे. हा व्हिडीओ साताऱ्यातील आहे.
advertisement
मिळालेल्या माहितीनुसार, साताऱ्यातील अंगापूर फाट्यानजीक एक तरुण रस्त्यावर धुडगूस घालत होता. रस्त्यावर येणाऱ्या जाणाऱ्या लोकांच्या अंगावर धावून येत होता. त्यामुळे गावात बातमी वाऱ्यासारखी पसरली. लोकांनी धाव घेतली. लोकांनी अक्षरश: त्याच्यावर जाळी टाकून त्याला पकडलं. रेबिजग्रस्त झाल्यामुळे हा तरुण असं वागत असल्याचं सांगितलं जात होतं. पण, या तरुणाची माहिती आता समोर आली आहे.
काय आहे नेमका प्रकार?
साताऱ्यातील अंगापूर फाट्याजवळ असणाऱ्या रस्त्यावर एका मनोरुग्ण व्यक्तीचा चांगलाच धुडगूस पाहायला मिळाला. गोपाल असं या व्यक्तीचं नाव आहे. तो रस्त्यावरील येणाऱ्या जाणाऱ्या लोकांच्या अंगावर धावून जात होता. जनावर प्रमाणे चालत तो समोर येईल त्याच्यावर हल्ला करत होता. शेवटी गावकऱ्यांनी एखाद्या जनावराला पकडावं तसं अंगावर जाळी टाकून त्याला पकडलं. या व्यक्तीला रेबीज झाला असावा, अशी चर्चा सर्वत्र पसरू लागली होती.
डॉक्टर काय म्हणाले?
स्थानिक लोकांनी गोपाल नावाच्या या मनोरुग्ण तरुणाला पकडलं आणि जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलं. त्यावेळी डॉक्टरांनी संबंधित व्यक्तीची तपासणी केली. यानंतर हा व्यक्ती मनोरुग्ण असल्याचं निष्पन्न झालं आहे. सध्या या तरुणाला एका बंद आयसोलेशन वार्डमध्ये ठेवण्यात आलं आहे. हा तरुण याच गावातला आहे की, इतर कुठून आला आहे, याचा तपास केला जात आहे. हा तरुण पकडल्याामुळे गावकऱ्यांचा जीव भांड्यात पडला आहे.
