सासपडे येथील आजी शालन पोळ म्हणाल्या की, "आमच्या गावात पूर्वीपासूनच दूध विकत नाहीत. दूध किंवा दुधाचा कुठला तरी पदार्थ विकला तरी आमच्या गाई- म्हशी परत गाभण राहत नाहीत. त्यामुळे आम्ही जनावर फक्त शेणासाठीच पाळतो. शेणाचा वापर आपापल्या शेतात खत म्हणूनच करतो."
ज्येष्ठ नागरिक शामराव पोळ म्हणाले की, "दूध का विकत नाहीत? याचे नेमके कारण आम्हाला पण माहित नाही. पण आमच्या आजोबा-पणजोबांपासून दूध किंवा दुधाचा कुठलाच पदार्थ विकलेला आम्ही पाहिलेला नाही. दूध विकणे आपल्याला धार्जिणे नाही, असे आम्हाला पूर्वीपासून सांगितले आहे. अनेकदा आम्ही दूध विकण्याचा प्रयत्न केला. मात्र, प्रत्येकवेळी काहीतरी अपशकुन घडलेय. जनावरे घेण्यासाठी आणि त्यांच्या संगोपनासाठी खर्च केलेला पैसासुद्धा वसूल झाला नाही. अनेक लोक दूध विकण्याचा प्रयत्न करतात. पण असे काही आडवं लागल्यावर त्याचा नाद सोडून देतात."
advertisement
सासपडे येथील तरुण शेतकरी सचिन पोळ म्हणाले की, "अलीकडे दुधातून लोकांना भरपूर उत्पन्न मिळते. आम्हालाही वाटते दुधाचा व्यवसाय करावा. परंतु गावातील पूर्वीच्या अनेक लोकांचे दूध व्यवसायाबद्दलचे वाईट अनुभव आहेत. कोणाचा गोठा जळाला, कोणाच्या गाई- म्हशी गाभण गेल्या नाहीत. यामुळे गावात दूध विक्रीबद्दल भीती निर्माण झाली आहे. अलीकडे काही लोक दूध विक्री करत आहेत. मात्र, कडेपूरच्या डोंगराई देवीला कौल लावून देवीची परवानगी घेतात. देवीने परवानगी दिली तरच दूध विक्री करतात. पण ज्या लोकांना देवीने कौल देऊन मान्यता दिली नाही ते लोक दूध विकायच्या नादाला लागत नाहीत. जनावरे केवळ शेणखतासाठी म्हणूनच पाळतात," असे ते म्हणाले.
सासपडे गावच्या परिसरामध्ये डोंगराई देवीचे प्रसिद्ध देवस्थान आहे. याच डोंगराई देवीची दूध विक्रीसाठी परवानगी नसल्याचा सासपडेकरांचा पूर्वीपासूनचा समज आहे. दूध न विकण्याच्या वेगळ्या रुढीचा गावाच्या विकासावर थेट परिणाम झाल्याचे गावकरी मान्य करतात. दुधामुळे आसपासच्या गावातील लोकांच्या घरात चार पैसे येतात. पण सासपडे येथील शेतकरी मात्र या पैशापासून दूर आहेत. एका प्रथेचा परिणाम थेट गावाच्या अर्थकारणावर झाला आहे. इथे दूध विकायचे नाव जरी काढले तरी लोक अनेक गुढ वाटणाऱ्या गोष्टी सांगत असतात.