ठाणे महानगरपालिकेचा अनधिकृत बांधकाम विभागाचा लाचखोर अधिकारी शंकर पाटोळे याला त्याच्या कार्यालयातून लाचलुचपत अधिकाऱ्यांनी अटक केल्यानंतर महापालिकेत एकच खळबळ उडाली असून, या प्रकरणात आता एका आमदाराचं नाव चर्चेत आलंय. हा तोच आमदार आहे ज्याने शंकर पाटोळेची तक्रार करायला बिल्डरला मुंबईला पाठवले तसेच गृहखात्याशी देखील संपर्क केला होता.
त्यानुसार सापळा रचून शंकर पाटोळे याला २५ लाख रुपये लाच घेताना मुंबई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अटक केली… हा आमदार कोण? सत्ताधारी की विरोधी पक्षातील हा आमदार आहे? अशा अनेक प्रश्नांनी ठाणे चांगलाच जोर धरलाय.
advertisement
शंकर पाटोळेला अटक केल्यानंतर काही समाज सेवकांनी मुंबई लाचलुचपत प्रतिबंधक विभागावर फुले उधळून त्यांचे अभिनंदन केले तर शंकर पाटोळेचा निषेध केला. दुसरीकडे मात्र पाटोळेच्या अटकेनंतर या जागेवर कोणाची वर्णी लागणार याकरिता अधिकाऱ्यांनी जोरदार फिल्डिंग लावली असून या पदावर वर्णी लागावी याकरिता अनेक अधिकाऱ्यांनी कोट्यवधी रुपयांची बोली लावल्याची ठाण्यात चर्चा आहे. आज पुन्हा एकदा शंकर पाटोळे याला ठाणे न्यायालयात हजर केले असता ठाणे त्याला २ दिवसांची पोलीस कोठडी दिलीये.
शंकर पाटोळे याच्या घराची लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने झडती घेतली असून त्यांच्या घरी अनधिकृत बांधकाम प्रकरणी काही महत्वाच्या फाईल्स सापडल्याची माहिती पोलिसांनी दिलीये. तर नियमानुसार शंकर पाटोळेला उपायुक्त पदावरुन हटवण्यात आले असून पाटोळेच्या या प्रतापामुळे महानगरपालिकेची चांगलीच बदनामी झाली आहे.