सांगली : महायुतीच्या उमेदवाराच्या प्रचार सभेत बोलताना विधानपरिषदेचे आमदार सदाभाऊ खोत यांची जीभ घसरली. सत्यजित देशमुख यांच्या प्रचाराची सभा शिराळा इथं पार पडली. तेव्हा बोलताना विरोधी उमेदवाराला सदाभाऊ खोत यांनी सज्जड दम दिला. त्यावेळी सदाभाऊ खोत म्हणाले की, सदाभाऊकडं नऊ नंबरचा नांगरी फाळ आहे आणि फाळ जर जमिनीत घुसवला तर एवढी फाटल. मीच गुंड असून बांबू कसा घालतो बघा.
advertisement
मी ज्या सभागृहात काम करतो त्या सभागृहाचे पूर्वी शिवाजीराव देशमुख सभापती होते. ते आजारी होते, रक्त त्यांना सतत बदलावे लागत होते आणि त्यानंतर उठून कामाला लागायचे. ते सभापती होते त्यावेळी कठीण आजारी काळामध्ये अविश्वासाचा ठराव आणला. त्यावेळी देशमुख साहेब म्हणत होते मी आजारी आहे. शेवटच्या पायरीवर उभा आहे. मी राजीनामा स्वतःहून देतो. माझा तुम्ही अपमान करू नका. मला काहीही नको आहे. थोडं मला बरे होऊ द्या. मी चालत त्या सभागृहात येतो. माझा सभापती पदाचा राजीनामा देतो आणि तुम्ही त्या माणसावरती अविश्वासाचा ठराव आणला. पवार साहेब ही तुमची गद्दारी आहे आणि त्या गद्दारीची परतफेड या शिराळा मतदार संघातील जनता केल्याशिवाय राहणार नाही असंही सदाभाऊ खोत म्हणाले.
कारखान्याच्या मुद्द्यावरूनही सदाभाऊ खोत यांनी विरोधकांवर निशाणा साधला. ते म्हणाले की, तुमच्यासारखं बँकेचं कर्ज काढायचं आणि ते कर्ज बुडवायचं हा धंदा सत्तू भाऊला करता आला नाही म्हणून तो कारखाना आजही चालू आहे. तुम्ही बँका हाणल्यासा. कारखाना कितीचा? शंभर कोटींचा, कर्ज किती? 300 कोटीचा, माफ करून घ्यायचं 200 कोटी. तुम्ही दरोडेखोर आहे. साखर कारखान्यावर बोलायला माझं आयुष्य गेलं जर साखर कारखाना आणि सत्तू भाऊंनी काय केलं. तुम्ही जर आरोप करायला लागला तर सदाभाऊकडे नऊ नंबरचा फाळ आहे, आणि तो फाळ जमिनीत घुसवला तर एवढी फाटेल.
कोण म्हणत असेल गुंडागर्दी, अमुक तमुक गुंडागर्दी काही नाही. मी दोन वेळा आमदार झालोय काय गोट्या खेळून झालो का? मी सभा बारामतीला जाऊन विरोधकांच्या घरासमोर जाऊन दारासमोर घेत होतो कारण इथे गुंड आपण आहोत. बांबू कसा घालतो बघा. जर गुंडागर्दी झाली तर त्याला सळीतून भाकर आणि नळीतून भाजी. गृहमंत्री हा आमचा महायुतीचा आहे. कोणीही विसरू नये आणि सदाभाऊ खोत आमदार आहे असंही सदाभाऊ म्हणाले.
सदाभाऊ खोत यांनी म्हटलं की, इस्लामपूरच्या नगरपालिकेच्या निवडणुकीत आपण रिंगण बघितले. कुठेही काही खूप झालं तर डायरेक्ट मला फोन करा. नाही बांबू लावला तर सदाभाऊ खोत नाव नाही सांगत. गुंडागर्दी करायला आम्हाला काय अरुण गवळीच्या टोळीत जायचं आहे काय? माझ्या मंत्री मंडळाच्या काळात सगळं गुंड आत होते आणि त्यांना मी मोका लावला होता. आता जर कोण भानगडीला निघाला तर त्याला बी मोका लावतो. त्याला सोडत नाही.
शरद पवार यांच्यावर थेट निशाणा साधताना सदाभाऊ खोत म्हणाले की, पवार आणि असे म्हणतात आम्ही आलो तर या योजना बंद करणार, काय तुम्ही तुमच्या शेतातील गांजा विकून देताय? बायकोची पेन्सिल बंद झाली तर तुमची भाकरी बंद. महिला आता सांगतीया महिन्याला आमची पेन्सिन येत आहे.
