मराठी माणसांच्या हितासाठी आमच्यातले क्षुल्लक आणि किरकोळ वाद संपवायला तयार आहोत, असे विधान मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी करून उद्धव ठाकरे यांच्याशी जुळवून घ्यायला तयार असल्याचे थेटपणे संकेत दिले. गेली महिना दोन महिने ठाकरे बंधुंच्या युतीच्या केवळ चर्चा होत असताना त्यासाठीचे पाऊल थेटपणे उचलले जात नव्हते. अखेर हिंदीसक्तीच्या मुद्द्यावरून मनसेने पहिले पाऊल पुढे टाकून थेट संजय राऊत यांना फोन करून मोर्चात सहभागी होण्याचे निमंत्रण दिले आहे.
advertisement
मनसेकडून संजय राऊत यांना खास निमंत्रण
हिंदीसक्तीच्या मुद्द्यावर मराठी माणूस म्हणून मराठी भाषेसाठी आपण एकत्रित यायला हवे. ६ जुलै रोजी आषाढी एकादशी असल्याने आपण ५ जुलै रोजी मुंबईत मोर्चाचे आयोजन केले आहे. पक्षीय भेदाभेद विसरून केवळ मराठी माणसाच्या आणि मराठी भाषेसाठी आपण मोर्चाला हजेरी लावा, असे खास निमंत्रण मनसे पक्षाकडून खासदार संजय राऊत यांना देण्यात आले आहे.
संजय राऊत राज ठाकरेंबरोबर मोर्चात सहभागी होण्याची शक्यता
दुसरीकडे मराठी अभ्यास केंद्राचे प्रमुख डॉ. दीपक पवार यांच्या हिंदीसक्ती विरोधातील आंदोलनाला उद्धव ठाकरे यांनी सक्रिय पाठिंबा देत असल्याचे जाहीर करून आझाद मैदानावर आंदोलन करणार असल्याचे सांगितले. एकाच मुद्द्यावरून ठाकरे बंधूंचे दोन मोर्चे असल्याने, मराठी ताकद दाखविण्याकरिता शिवसेना आझाद मैदानावरील मोर्चा रद्द करून ५ जुलै रोजीच्या मोर्चात सहभागी होणार का? हे पाहणे अतिशय महत्त्वाचे असणार आहे.
राज ठाकरे यांचे सूचक वक्तव्य, शिवसेना मोर्चात सहभागी होण्याची दाट शक्यता
आमच्यातल्या कोणत्याही वादापेक्षा आणि भांडणांपेक्षा महाराष्ट्र मोठा आहे, असे सांगून येत्या ५ तारखेला माझ्या वाक्याचा नेमका अर्थ तुम्हाला कळेल, असे राज ठाकरे सूचकपणे म्हणाले. त्यांच्या विधानावरून शिवसेना पक्ष राज ठाकरे यांच्या आवाहनाला सकारात्मक प्रतिसाद देऊन मोर्चात सहभागी होऊ शकतो, अशी दाट शक्यता राजकीय जाणकरांकडून व्यक्त केली जात आहे.