अशात मनसेच्या ठाण्यातील उमेदवार राजश्री नाईक यांना देखील उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी पाच कोटींची ऑफर दिली होती. पण त्यांनी ही ऑफर नाकारली. काहीही झालं तरी निवडणूक लढणार, असा इरादा नाईकांनी स्पष्ट केला. ठाण्यात झालेल्या एका जाहीर सभेत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी राजश्री नाईक यांच्या प्रामाणिकपणाचे जाहीर कौतुक केलं होतं. "निवडणूक लढवू नये यासाठी राजश्री नाईक यांना ५ कोटी रुपयांची ऑफर देण्यात आली होती, पण त्यांनी ती धुडकावून लावली," असं सांगत राज ठाकरेंनी त्यांना व्यासपीठावर बोलावून त्यांचं कौतुक केलं होतं. त्यामुळे या निवडणुकीत राजश्री नाईक यांचं काय होणार? याकडे सगळ्या राज्याचं लक्ष लागलं होतं.
advertisement
पण मनसेच्या उमेदवार राजश्री नाईक यांना पराभवाचा सामना करावा लागला आहे. शिवसेना (शिंदे गट) उमेदवार नम्रता हेमंत पमनानी यांनी त्यांचा पराभव केला. राजश्री नाईक या ठाण्याच्या प्रभाग क्रमांक २० मधून निवडणुकीच्या मैदानात उतरल्या होत्या. या प्रभागात कोपरी कॉलनी, चेंदणी पूर्व, पारसी कॉलनी, ठाणेकरवाडी आणि बारा बंगला असं शिंदे गटाचं वर्चस्व असलेल्या भागाचा समावेश होतो. इथं अत्यंत चुरशीची लढत पाहायला मिळाली.
पण या निवडणुकीत नम्रता पमनानी यांनी राजश्री यांचा ७२९५ मतांनी पराभव केला. या निवडणुकीत नम्रता हेमंत पमनानी यांना १६ हजार ५७५ मतं मिळाली. तर राजश्री नाईक यांना ९ हजार २८० मतं मिळाली. नम्रता पमनानी यांनी नाईक यांचा मोठ्या मताधिक्याने पराभव केला असून, या प्रभागावर शिंदे गटाने आपले वर्चस्व कायम राखले आहे.
