सोलापूर : राज्यात महापालिका निवडणुकीचा धुरळा उडाला आहे. अर्ज मागे घेण्यासाठी एकीकडे धावपळ सुरू असताना सोलापूरमध्ये धक्कादायक घटना घडली आहे. सोलापुरात राजकीय वादातून एकाची हत्या करण्यात आली आहे. हा तरुण मनसेचा पदाधिकारी असल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सोलापूर महापालिकेसाठी प्रभाग क्रमांक २ मध्ये ही घटना घडली. बाळासाहेब सरवदे असं हत्या झालेल्या व्यक्तीचं नाव आहे. मनसे विद्यार्थी सेनेचे पदाधिकारी असलेल्या बाळासाहेब सरवदे यांची राजकीय वादातून हत्या झाल्याचा आरोप केला जात आहे. सोलापूर महापालिका प्रभाग 2 मध्ये अर्ज माघारी घेण्यावरून आज भाजपच्या दोन गटात वाद झाला होता. प्रभाग २ मध्ये शालन शिंदे या भाजपच्या अधिकृत उमेदवार आहेत तर त्याच्या विरोधात भाजपच्या बंडखोर रेखा सरवदे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला होता.
advertisement
'मध्यस्थी करायला गेले आणि हल्ला केला'
रेखा सरवदे यांनी अर्ज माघारी घ्यावा, यासाठी शिंदे आणि सरवदे या दोन गटात मोठा वाद झाला होता. या वादात भाजप नेते शंकर शिंदे यांचे कार्यालय देखील फोडण्यात आलं होतं. मात्र त्याचं वेळी शिंदे गटाच्या लोकांनी मध्यस्तीसाठी आलेल्या बाळासाहेब सरवदे यांच्यावर जीवघेणा हल्याचा आरोप सरवदे यांच्या नातेवाईकांनी केला आहे.
या हल्यात गंभीर जखमी झालेल्या बाळासाहेब सरवदे यांना उपचारासाठी तातडीने सोलापूरच्या सहकारी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं, मात्र उपचारा दरम्यान त्यांचा मृत्यू झाल्याची माहिती डॉक्टरांनी दिली. याा घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली आहे. सरवदे यांच्या नातेवाईक आणि मनसेच्या कार्यकर्त्यांनी रुग्णालयाच्या परिसरात धाव घेतली.
शिंदे गटाच्या लोकांनी केली हत्या, मनसे पदाधिकाऱ्यांचा आरोप
दरम्यान प्रभाग 2 मधून भाजप आमदार विजयकुमार देशमुख यांचे पुत्र किरण देशमुख हे निवडणुकीच्या रिंगणात आहेत. हे संपूर्ण पॅनल बिनविरोध करण्यासाठी भाजपकडून मोठा दबाव होता, त्यामुळे सरवदे कुटुंबावर दबाव भाजप नेत्याकडून आणला जात होता. समाजात वाद नको म्हणून ते सोडवायला मनसे नेते बाळासाहेब सरवदे गेले होते. त्यावेळी शिंदे गटातील लोकांनी त्यांची हत्या केल्याचा आरोप मनसेचे पदाधिकारी प्रशांत इंगळे यांनी केला.
दरम्यान, बाळासाहेब सरवदे हत्या प्रकरणी सोलापूर पोलिसांनी 11 संशयित आरोपी असल्याची नोंद केली आहे. यातील 4 जणांना सोलापुरातील जेल रोड पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.
