निलेश राणे हे काही कार्यकर्त्यांसह संबंधित पदाधिकाऱ्यांच्या निवासस्थानी पोहोचले असता, तेथे घरात मोठ्या प्रमाणावर रोख रक्कम ठेवलेली असल्याचे त्यांनी जाहीररित्या सांगितले. निवडणुकीदरम्यान मतदारांना प्रभावित करण्यासाठी काळा पैसा वापरण्याचा प्रकार सुरू असून, हा त्याचाच पुरावा आहे, असा दावा राणे यांनी केला आहे. त्यांनी आपला मोबाईल कॅमेरा सुरू ठेवत घरातील दृश्ये थेट प्रसारित केली, ज्यामध्ये भाजप पदाधिकाऱ्याच्या घरात पैशाची बॅग आढळून आली आहे.
advertisement
मालवण पोलिस घटनास्थळी दाखल
या घटनेची माहिती मिळताच परिसरात नागरिकांची गर्दी जमली असून वातावरण तणावपूर्ण झाले आहे. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेता निलेश राणे यांनी तत्काळ पोलिसांना पाचारण केले. काही वेळातच मालवण पोलिस घटनास्थळी दाखल झाले असून त्यांनी संबंधित घराची पाहणी सुरू केली आहे. पोलिसांकडून पंचनामा करून पुढील कायदेशीर कारवाई केली जात असल्याचे प्राथमिक सूत्रांकडून सांगण्यात येत आहे.
योग्य ती कारवाई करण्याची निलेश राणेंची मागणी (Video)
निलेश राणे यांनी पोलिसांशी संवाद साधताना म्हणाले, निवडणुकांसाठी अजून सहा दिवस बाकी आहे. माझ्याकडे यादी आहे, एका-एका पदाधिकाऱ्याच्या घरात २०-२५ लाख सापडले आहे. लवकरात लवकर बंदोबस्त करा किंवा कडक कारवाई करा.. नाहीतर मी स्वत: यांचा बंदोबस्त करेल.... हे सगळे लवकरात लवकर थांबवले पाहिजे. योग्य ती कारवाई करा...
वातावरण अधिक चिघळण्याची शक्यता
निवडणूक काळात अशा प्रकारच्या घटनांमुळे वातावरण अधिक चिघळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. अद्याप भाजप पदाधिकाऱ्याकडून कोणतीही प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही. ही बाब राज्य निवडणूक आयोगाच्या निदर्शनास आणली जाणार असल्याचेही सांगण्यात येत असून, या प्रकरणावर आयोग काय भूमिका घेतो याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. एकीकडे आरोप-प्रत्यारोपांचा फड रंगत असतानाच, सत्य काय आहे हे पोलिस तपासानंतरच स्पष्ट होणार आहे.
