ही घटना तिवसा शहरातील अशोक नगर परिसरात घडली. अमोल डाखोरे आणि सुशीला डाखोरे असं हत्या झालेल्या मायलेकाचं नाव आहे. हा दुहेरी हत्याकांड वर्षभरापूर्वी झालेल्या एका हत्येच्या बदल्यात झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. पोलीस घटनेचा सविस्तर तपास करत आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, मृतक अमोल डाखोरे याने गेल्या वर्षी सुधाकर अवझाड नावाच्या व्यक्तीचा खून केला होता. याच खुनाचा बदला घेण्यासाठी आज सकाळी सुधाकरचा मुलगा रोहन याने अमोल आणि त्याच्या आई सुशीला डाखोरे यांना लक्ष्य केलं.
advertisement
आज सकाळी अमोल आणि सुशीला डाखोरे हे आपल्या घरासमोर बसले होते. याच वेळी शेजारी राहणाऱ्या आरोपी रोहन सुधाकर अवझाड याने धारदार शस्त्राने त्यांच्यावर सपासप वार केले. या हल्ल्यात अमोलचा जागीच मृत्यू झाला. तर आई सुशीला डाखोरे रक्ताच्या थारोळ्यात पडल्या. या हल्ल्याच्या वेळी आपल्या वडिलांना आणि आजीला वाचवण्यासाठी पुढे आलेल्या १० वर्षांच्या हिमांशू डाखोरेच्या डाव्या हाताची दोन बोटे कापली आहेत. या हल्ल्यानंतर गंभीर जखमी झालेल्या सुशीला डाखोरे यांना उपचारासाठी तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले, परंतु उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.
या घटनेची माहिती मिळताच तिवसा पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली आणि आरोपी रोहन सुधाकर अवझाड याला काही तासांतच अटक केली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जुन्या वैमनस्यातून हा वाद झाला. पोलीस निरीक्षक गोपाल उपाध्याय यांनी या घटनेची पुष्टी केली असून, पुढील तपास सुरू आहे. या घटनेमुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.