विरेंद्रसिंह तावडे, अमोल काळे, शरद कळसकर हे कळंबा कारागृहात होते. अनेकदा जामीन अर्ज करूनही त्यांना जामीन मंजूर होत नव्हता. अखेर नुकत्याच स्थापन झालेल्या कोल्हापूर बेंचच्या सुनावणीअंती तिघा आरोपींना जामीन मंजूर करण्यात आला. महत्त्वाचे म्हणजे ज्या १२ आरोपींना आजपर्यंत अटक करण्यात आली होती, त्या सगळ्यांनाच जामीन मिळाल्याने कॉम्रेड पानसरे यांची हत्या नेमकी केली कुणी, हा प्रश्न अनुत्तरित आहे.
advertisement
याआधी सहा आरोपींना जामीन मंजूर
याआधी सचिन अंदुरे, गणेश मिस्कीन, अमित डेगवेकर, भारत कुराणे आणि वासुदेव सूर्यवंशी या सहा आरोपींना न्यायमूर्ती अनिल किलोर यांच्या एकलपीठाने जामीन मंजूर केला होता.
कॉम्रेड गोविंद पानसरे हत्याकांड प्रकरण नेमके काय?
'शिवाजी कोण होता?' हे पुस्तक लिहून बहुजन समाजाला खऱ्या शिवाजी राजाची ओळख देणारे द्रष्टे लेखक, असंघटित क्षेत्रातील कामगारांचे प्रश्न ऐरणीवर आणणारे राज्यातील आघाडीचे कामगार नेते, कॉम्रेड गोविंद पानसरे यांची हत्या १६ फेब्रुवारी २०१५ रोजी झाली. पत्नीसह प्रभात फेरीला गेलेल्या पानसरे यांच्यावर दुचाकीवरून आलेल्या दोघांनी गोळीबार केला. गुन्हे अन्वेषण विभाग आणि विशेष पोलीस पथकाच्या मार्गदर्शनाखाली तपास करण्यात आला. मात्र पानसरे यांच्या मारेकऱ्यांना शोधण्यात पोलिसांना यश आले नाही. गेल्या १० वर्षांपासून केवळ संशयितांना ताब्यात घेण्यावाचून पोलिसांच्या हाताला काहीही लागले नाही. कुटुंबाच्या मागणीनुसार ऑगस्ट २०२२ साली दहशतवादविरोधी पथकाकडे तपास देण्यात आला. मात्र एकामागून एक १२ आरोपींना जामीन मिळाल्याने पानसरे यांची हत्या कुणी केली, या प्रश्नाचे उत्तर मिळाले नाही.