आज सकाळी आठ वाजता कुलाबा जैन मंदिरातून मोर्चा निघणार आहे. हा मोर्चा आझाद मैदानात दाखल होणार असून तिथेच उपोषण आंदोलन सुरू होणार आहे. यावेळी मोठ्या प्रमाणावर जैन समुदायातील बांधव, पक्षीप्रेमी उपस्थित राहण्याची शक्यता आहे. या आंदोलनामुळे मुंबईत पुन्हा एकदा वातावरण पेटण्याची शक्यता आहे.
मुंबई उच्च न्यायालयाने कबुतरांमुळे होणाऱ्या आजारांचा मुद्दा लक्षात घेऊन कबुतरखाने बंद करण्याचे आदेश दिले होते. त्याविरोधात जैन धर्मगुरू आणि समुदायातात नाराजी पसरली होती. हायकोर्टाच्या आदेशानंतर मुंबई महापालिकेने दादर कबुतरखाना बंद केला. त्यानंतर मात्र, जैन समुदायाने याचा आक्रमक विरोध करत ताडपत्री आणि शेड लावून बंद केलेला कबुतरखाना सुरू करण्याचा प्रयत्न केला होता. त्यानंतर या आंदोलनाच्या विरोधात मराठी एकीकरण समितीने देखील आंदोलन केले.
advertisement
मागण्या पूर्ण होईपर्यंत आंदोलन...
जैन मुनी निलेशचंद्र यांनी स्पष्ट इशारा दिला आहे की, "आमच्या मागण्या पूर्ण होत नाहीत तोपर्यंत हे उपोषण सुरूच राहणार आहे. न्यायालयाचा आदेश असला तरी सरकारला मार्ग काढण्यासाठी सांगितलं आहे. मात्र तरीही तोडगा काढला जात नाही. जीवदया फक्त जैन समाजासोबत जोडत आहे. मात्र, इथे प्रत्येक व्यक्ती दाणे टाकतो, असं जैन मुनी निलेशचंद्र विजय यांनी सांगितले. आम्हाला आमचे जुने कबुतरखाने पाहिजे, अशी आग्रही मागणीदेखील त्यांनी केली. आझाद मैदान परिसरात मोठ्या संख्येने जैन बांधवांची उपस्थिती राहण्याची शक्यता आहे.
मुंबई महापालिकेकडून चार पर्यायी जागा...
दरम्यान, मुंबईतील मध्यवर्ती ठिकाणचे कबुतरखाने बंद केल्यानंतर मुंबई महापालिकेने कबुतरखान्यासाठी चार पर्यायी जागा सुचवल्या आहेत. या ठिकाणी फक्त सकाळी 7 ते 9 या वेळेतच कबुतरांना दाणे देता येतील. स्वयंसेवी संस्थांना जबाबदारी स्वीकारुन या कबुतरखान्याचे व्यवस्थापन करावे लागणार आहे. मुंबई महापालिकेने वरळी जलाशय (Worli Reservoir), अंधेरी पश्चिम येथील लोखंडवाला बॅक रोडवरील खारफुटी परिसर, ऐरोली-मुलुंड जकात नाका परिसर आणि बोरिवली पश्चिमेतील गोराई मैदान या ठिकाणी कबुतरांना दाणे टाकण्यासाठी जागा सुचवल्या आहेत.
