मुंबईच्या कुर्ला कारशेडमध्ये आज लोकलला स्वयंचलित दरवाजे बसवल्यानंतर त्यांची चाचणी घेण्यात आली. यामध्ये रेड सिग्नल वाजताना लोकलचा दरवाजा आपोआप उघडताना दिसत आहे. त्यासोबत लोकलच्या दरवाजावर उभं राहिल्यास दरवाजा बंद होत नसल्याचे दिसत आहे.त्यामुळे ही चाचणी यशस्वीरीत्या पुर्ण झाल्याचे समजते आहे.पण याबाबत रेल्वेकडून कोणतीही माहिती समोर आलेली नाही.पण जर खरंच ही चाचणी पू्र्ण झाली असेल तर मुंबईकरांच्या सेवेत लवकरच स्वयंचलित दरवाजे असणारी लोकल येणार आहे.
advertisement
डिसेंबरपासून स्वयंचलित दरावाजाचे लोकल सूरू
रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी गेल्या आठवड्यात घोषणा केली होती की डिसेंबर 2025 पासून मुंबईत बंद दरवाज्यांच्या लोकल ट्रेन सुरू होतील.मुंबईतील प्रवाशांच्या सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून, मुंबईत धावणाऱ्या कोणत्याही लोकल ट्रेनचे दरवाजे बंद असणे अत्यंत महत्वाचे आहे. आता असे ठरवण्यात आले आहे की यापुढे मुंबईसाठी बनवल्या जाणाऱ्या सर्व गाड्या बंद दरवाजे असतील. या संदर्भात आम्ही तीन प्रयोग केले आहेत. पहिला म्हणजे सर्व विद्यमान लोकल ट्रेनमध्ये दरवाजे रेट्रोफिटिंग करणे, दुसरा म्हणजे उत्पादित केल्या जाणाऱ्या सर्व नॉन-एसी गाड्या बंद दरवाजे असतील आणि स्वाभाविकच, उत्पादित केल्या जाणाऱ्या एसी गाड्या देखील बंद दरवाजे असतील. सर्व लोकल ट्रेनमध्ये, एसी किंवा नॉन-एसी, बंद दरवाजे ठेवण्याचा तत्वतः निर्णय घेण्यात आला आहे, असे केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव म्हणाले.
सोमवारपर्यंत तीन प्रयोग करण्यात आले आहेत आणि मी आधी आश्वासन दिल्याप्रमाणे, डिसेंबर २०२५ पर्यंत विद्यमान गाड्या बंद करण्याचे काम सध्या सुरू आहे. आम्ही २३८ एसी लोकल ट्रेनसाठी आधीच निविदा काढल्या आहेत आणि ही प्रक्रिया आधीच सुरू झाली आहे," असे ते म्हणाले.
'त्या' घटनेनंतर लोकलची रचना बदलण्याचा निर्णय
खरं तर मुब्र्यामध्ये 9 जूनला लोकलमधून पडून 4 प्रवाशांचा मृत्यू झाला होता. या घटनेनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईच्या उपनगरीय रेल्वेतील सर्व डबे आता वातानुकुलित आणि स्वयंचलित दरावाजांसह बदलले जाणार आहेत. यासाठी प्रवाशांच्या भाड्यात कोणतीच वाढ करण्यात येणार नसल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली होती. तसेच केंद्राला स्वयंचिलत दरवाजे बसवण्याची विनंती करणार असल्याचेही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले होते.
गेल्या 3 वर्षात लोकल ट्रेनमधून प्रवास करताना 7हजार 565 प्रवाशांचा मृत्यू झाला असून 7 हजार 293 जण जखमी झाले आहेत,अशी माहिती राज्य परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली होती.