शिंदेंनी आपल्याच निवडून आलेल्या नगरसेवकांना अशाप्रकारे हॉटेलात ठेवल्याने विविध चर्चांना उधाण आलं आहे. नगरसेवक फुटू नयेत, यासाठी खबरदारी उपाय म्हणून त्यांनी हा निर्णय घेतल्याची चर्चा आहे. दुसरीकडे, मुंबईत भाजपचा महापौर होऊ नये, असं एकनाथ शिंदेंना देखील वाटतं, असं वक्तव्य संजय राऊतांनी केलं आहे. या सगळ्या घडामोडीनंतर आता शिवसेना शिंदे गटाचे मंत्री आणि आमदार गुलाबराव पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
advertisement
एकनाथ शिंदे यांच्या डोक्यात काय असतं, हे मला माहीत आहे, अशा आशयाचं वक्तव्य गुलाबराव पाटील यांनी केलं आहे. शिवाय संजय राऊत ताज लँड्स एंड हॉटेलमध्ये जेवायला जाणार आहेत, या वक्तव्यावर देखील त्यांनी प्रतिक्रिया दिली.
शिवसेनेच्या नगरसेवकांना हॉटेलमध्ये डांबून ठेवण्याबद्दल विचारलं असता गुलाबराव पाटील म्हणाले, "ते एकनाथ शिंदे साहेब आहेत. त्यांच्या डोक्यात काय असतं, हे मला माहिती. जिथे इंजिन चालते तिकडे डब्बा चालतो. नेत्याच्या पुढे आम्हाला जाता येत नाही."
ज्या हॉटेलमध्ये शिंदे सेनेच्या नगरसेवकांना ठेवलं आहे. त्याच हॉटेलमध्ये आम्ही जेवायला जाणार असल्याच्या संजय राऊत यांच्या वक्तव्यावर गुलाबराव पाटील म्हणाले, संजय राऊत यांनी त्या हॉटेलला जेवायला यावं, पण त्यांचं बिल त्यांनीच भरावं, असा मिश्किल टोला त्यांनी लगावला आहे.
