पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नियामतुल्ला अयुब खान उर्फ जूली आणि शाहिद नियामतुल्ला खान हे पिता पुत्र घरात घुसून चोरी करण्यासाठी कुप्रसिद्ध होते. त्यांनी 18 ऑक्टोबर रोजी रात्री 11 वाजताच्या सुमारास मुंबईतील आरे कॉलनीतील रॉयल पाम्स इस्टेटमधील बंगला क्रमांक 21 मध्ये घुसून चोरी केली होती. यावेळी बंगल्यातून त्यांनी 36.15 लाख रुपयांचे मौल्यवान सोने आणि हिऱ्यांचे दागिने चोरी केले होते.
advertisement
या घटनेची तक्रार मिळताच आरे पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला होता. यावेळी तपासासाठी त्यांनी अनेक पथके तयार केली होती. तसेच तांत्रिक विश्लेषण आणि सीसीटीव्ही फुटेज वापरून तपास सुरू केला होता. पोलिसांनी या तपासा दरम्यान तब्बल 35 सीसीटीव्ही फुटेज तपासल्या होत्या.त्यामुळे आरे पोलिसांनी आरोपींची ओळख पटली होती. पण सीसीटीव्ही फुटेजमध्ये आरोपींचे चेहरे स्पष्ट दिसत नसल्याने त्यांनी सूत्रांच्या मदतीने आरोपींचा शोध सुरू केला. आरे पोलिसांनी सापळा रचला आणि गोरेगाव येथून नियामतुल्ला अयुब खान उर्फ जूली आणि शाहिद नियामतुल्ला खान या बाप बेट्याला अटक केली. विशेष म्हणजे अवघ्या 12 तासात या गुन्ह्याचा छडा लावला. अटक केलेल्या पिता-पुत्राच्या जोडीकडून 46.65 लाख रूपयांचे मौल्यवान सोने आणि हिऱ्यांचे दागिने जप्त करण्यात आले.
दरम्यान अटक केलेल्या वडील आणि मुलाविरुद्ध मुंबईतील विविध पोलिस ठाण्यात अनेक चोरीचे गुन्हे दाखल आहेत. अटक केलेल्या दोन्ही चोरांनी मुंबईत आणखी कुठे चोरी केली आहे हे शोधण्यासाठी आरे पोलिस त्यांची चौकशी करत आहेत.
