मुंबई: मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्त्वातील मराठा आरक्षण आंदोलनाला राज्य सरकारने सकारात्मक प्रतिसाद दिला. मनोज जरांगे पाटील यांच्या 8 पैकी 6 मागण्या सरकारने मान्य केल्या. मागील पाच दिवसांपासून मुंबईत सुरू असलेले आंदोलनाची यशस्वी सांगता झाली. मात्र, मराठा आंदोलकांनी मुंबई सोडताच पोलिसांनी आंदोलकांवर गुन्हे दाखल केले आहेत. विविध कलमांतर्गत मुंबईतील दोन पोलीस ठाण्यात मराठा आंदोलकांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे.
advertisement
राज्य सरकारने मागण्यांवर तोडगा काढला असला तरी आंदोलकांविरोधातील कारवाई थांबलेली नाही. मरीन ड्राईव्ह आणि डोंगरी पोलीस ठाण्यात मराठा आंदोलकांविरोधात नवे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. गैरकायद्याची मंडळी जमवल्याप्रकरणी तसेच दमदाटी केल्याप्रकरणी ही कारवाई करण्यात आली आहे.
आंदोलनाच्या काळात मुंबईसह विविध भागांत मराठा समाज मोठ्या संख्येने जमला होता. त्यावेळी कायदा आणि सुव्यवस्था बिघडू नये यासाठी पोलिसांकडून कठोर उपाययोजना करण्यात आल्या होत्या. मात्र, आंदोलकांकडून झालेल्या नियमभंग, धमकावणे व गर्दी जमवण्याच्या प्रकारांवरून गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया सुरूच आहे. आतापर्यंत मराठा आंदोलकांविरोधात अनेक गुन्हे दाखल झाले आहेत. यामध्ये आंदोलकांवर दडपशाही, धमकी, सार्वजनिक सुव्यवस्थेचा भंग अशा गंभीर कलमांचा समावेश आहे. यामुळे आंदोलन संपुष्टात आले असले तरी कायदेशीर कारवाईची तलवार आंदोलकांवर लटकत आहे.
दरम्यान, बहुतांश मागण्या मान्य झाल्यानंतर मनोज जरांगे पाटील यांनी मंगळवारी आपले आमरण उपोषण मागे घेतले. त्यांच्या या निर्णयानंतर हजारोंच्या संख्येने मुंबईत दाखल झालेले मराठा बांधव माघारी परतले. विजयाचा गुलाल उधळत आंदोलन संपुष्टात आले असले तरी आंदोलकांविरोधात सुरू असलेल्या गुन्हे नोंदणीमुळे मराठा समाजात असंतोषाचे वातावरण निर्माण झाले आहे.
किती आणि कोणत्या पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल?
- मरीन ड्राइव्ह पोलीस ठाणे 2
- आझाद मैदान पोलीस ठाणे 3
- माता रमाबाई पोलीस ठाणे 1
- जेजे मार्ग पोलीस ठाणे 1
- डोंगरी पोलीस ठाणे 1
- कुलाबा पोलीस ठाणे 1
एकूण साऊथ मुंबई, झोन एक मध्ये 9 FIR