मागील चार दिवसात आझाद मैदानाबाहेरील परिसर आणि मुंबईतील ठिकाणी कशा प्रकारे आंदोलकांनी वर्तवणूक केली, नियमांचे उल्लंघन केले, याची माहिती मुंबई पोलिसांनी आपल्या नोटीसमध्ये दिली आहे. यामध्ये अटी-शर्तीचे उल्लंघन करत ज्येष्ठ नागरिकांचा सहभाग, आत्मदहनाचा प्रयत्न, फुटीरतावादी भूमिका मांडली गेली असल्याचा ठपका पोलिसांनी ठेवला आहे.
मुंबई पोलिसांची नोटीस वाचा शब्द अन् शब्द जशाच्या तसा....
advertisement
वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांचे कार्यालय,
आझाद मैदान पोलीस ठाणे,
महापालिका मार्ग, मुंबई-४०० ००१
जावक क्रमांक ७७२० / कावसु/२०२५
दिनांक ०२/०९/२०२५.
प्रति,
आमरण उपोषण अंतरवाली सराटी,
ता. अंबड, जि. जालना.
१) श्री. किशोर आबा मरकड (कोर कमिटी सदस्य),
२) श्री. पांडुरंग तारक (कोर कमिटी सदस्य),
३) श्री. शैलेंद्र मरकड (कोर कमिटी सदस्य),
४) श्री. सुदाम बप्पा मुकणे (कोर कमिटी सदस्य),
५) श्री. बाळासाहेब इंगळे (कोर कमिटी सदस्य),
६) श्री. अॅड. अमोल लहाणे (कोर कमिटी सदस्य),
७) श्री. श्रीराम कुरणकर (कोर कमिटी सदस्य),
८) श्री. संजय कटारे (कोर कमिटी सदस्य),
ज्याअर्थी, मा. मुंबई उच्च न्यायालयाने जनहित याचिका क्र. २५६५६/२०२५ (अॅमी फॉऊंडेशन वि. महाराष्ट्र राज्य
व इतर) च्या सुनावणीमध्ये दिनांक २६/०८/२०२५ रोजी दिलेल्या आदेशात खालीलप्रमाणे निर्देश दिले होते :-
१) प्रतिवादी क्र. ०५, ०६ व ०७ म्हणजेच आपण स्वतः, श्री. विरेंद्र पवार व आमरण उपोषण अंतरवाली सराटी, यांनी "जाहिर सभा, आंदोलने व मिरवणूका नियम, २०२५" अन्वये सक्षम प्राधिकारी यांची परवानगी प्राप्त केल्याशिवाय आझाद मैदान, मुंबई येथे कोणतेही आंदोलन करू नये.
२) प्रतिवादी यांना असे आंदोलन करावयाचे असल्यास त्यासाठी त्यांनी "जाहिर सभा, आंदोलने व मिरवणूका नियम, २०२५" अन्वये अर्ज सादर करावा.
३) मुंबई शहरातील जनजीवन विस्कळीत होवू नये यासाठी प्रतिवादी यांना खारघर, नवी मुंबई या ठिकाणी आंदोलन करण्यास पर्यायी जागा उपलब्ध करून देण्याबाबत शासनाने विचार करावा.
४) सक्षम प्राधिकारी यांनी प्रतिवादी यांना "जाहिर सभा, आंदोलने व मिरवणूका नियम, २०२५" अन्वये आंदोलन
करण्यास परवानगी दिल्यास सक्षम प्राधिकारी यांनी घालून दिलेल्या सर्व अटी व शर्तीचे पालन प्रतिवादी करतील.
आणि ज्याअर्थी, तद्नंतर आपण केलेल्या अर्जानुसार दि. २९/०८/२०२५ रोजी सकाळी ०९:०० ते १८:०० वा. दरम्यान आझाद मैदान, मुंबई येथे आपल्या मागण्यांकरीता एक दिवस आंदोलन करण्याची परवानगी या कार्यालयाचे पत्र
क्रमांक ७६०८/२०२५, दिनांक २७/०८/२०२५ अन्वये आपणांस देण्यात आली होती. नमूद परवानगी देताना आपणांस "जाहीर सभा, आंदोलने व मिरवणुका (अपर पोलीस आयुक्त, दक्षिण विभाग, मुंबई यांच्या अधिकार क्षेत्रात) नियम, २०२५" व मा. मुंबई उच्च न्यायालय यांचे उपरोक्त नमूद प्रकरणातील दि. २६/८/२०२५ रोजीचे अंतरिम आदेशाची माहिती देण्यात आली होती. तसेच तत्पुर्वी आपणास दिनांक २६/८/२०२५ रोजीचे पत्राद्वारे मा. उच्च न्यायालयाचे उपरोक्त नमूद अंतरिम आदेश व "जाहीर सभा, आंदोलने व मिरवणुका नियम, २०२५" या नियमावलीची प्रत देखील देण्यात आली होती.
आणि ज्याअर्थी, महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार-क वर्ष ११, अंक ३०) मंगळवार, ऑगस्ट २६, २०२५/भाद्रपद ४, शके १९४७, असाधारण क्रमांक ४५, प्रधिकृत प्रकाशन अन्वये "जाहीर सभा, आंदोलने व मिरवणुका मैदान अपर पोलीस आयुक्त, दक्षिण विभाग, मुंबई यांच्या अधिकार क्षेत्रात) नियम, २०२५ नुसार आंदोलकांना सार्वजनिक सभा, संमेलने, मोर्चे, आंदोलने, निदर्शने, धरणे, मेळावे, मिरवणुका, इत्यादीसाठी आझाद मैदान (राखीव भाग), निश्चित करण्यात आलेला आहे. नमुद नियमावली मध्ये आझाद मैदान या ठिकाणाची निश्चिती रहिवाशांना, रहदारीला, कमीत-कमी अडथळा होण्याचे आणि विनियमित केलेल्या रितीने निदर्शकांसाठी पुरेशी जागा उपलब्ध होण्याचे तत्व विचारात घेवून करण्यात आलेली आहे.
आणि ज्याअर्थी, मा. उच्च न्यायालय, मुंबई यांचे जनहित याचिका (L) क्र. २५६५६/२०२५ यामधील दिनांक
२६/०८/२०२५ रोजीच्या अंतरिम आदेशामध्ये परिच्छेद कमांक ७ (iv) मध्ये स्पष्ट निर्देश आहेत की, प्रतिवादी क्रमांक ५, ६ व ७ आणि त्यांचे सहकारी यांनी परवानगी प्राप्त आंदोलनाचे अनुषंगाने संबधित प्राधिकृत अधिकारी यांनी आंदोलनासाठी घातलेल्या अटी व शर्ती हे पाळणे बंधनकारक आहे (The Respondent Nos. 5, 6 and Respondent No. 7- Amaran Uposhan Antarawali Sarati and their associates will abide by the condition on which permission may be granted by the Competent Authority under the Public Meetings, Agitations and Processions Rules, 2025).
तसेच मा. सर्वोच्च न्यायालयाने "अमित साहनी केस" मध्ये आंदोलनामुळे सामान्य जनजीवन व वाहतूक बाधित होणार नाहीत याबाबत दिलेल्या निर्देशांचा, मा. उच्च न्यायालयाने आपल्या सदर आदेशामध्ये पुनरोच्चार केलेला आहे.
आणि ज्याअर्थी, आंदोलनाचे आयोजक तसेच मुख्य आंदोलक म्हणून आपणावर बंधनकारक असलेले "जाहिर सभा, आंदोलने व मिरवणूका नियम, २०२५ " मधील नियम व मा. मुंबई उच्च न्यायालयाने उपरोक्त नमूद प्रकरणामध्ये दिलेले उपरोक्त नमूद आदेश याबाबत आपणास सविस्तर माहिती पूरविण्यात आलेली असताना देखील आपण दिनांक २९/०८/२०२५ रोजी पासून आझाद मैदान, मुंबई येथे आपले आमरण उपोषण हे आंदोलन सुरू केले असून त्यामध्ये आपल्यासह महाराष्ट्राच्या विविध भागातील सुमारे ४०,००० आंदोलकाचा समावेश करण्यात आलेला आहे.
तसेच, सदर आंदोलनाशी संबंधित असलेली सुमारे ११,००० लहान मोठी चार चाकी वाहने मुंबई शहरात आणण्यात आली आहेत.
त्यातील सुमारे ५००० वाहने हि दक्षिण मुंबईतील आझाद मैदान, मा. उच्च न्यायालय परिसर, मंत्रालय परिसर, कुलाबा, काळबादेवी, डोंगरी, पायुधनी, वाडीबंदर, इ. परिसरात आणण्यात आली असून त्यातील बहुतेक वाहने हि दक्षिण मुंबईतील महात्मा गांधी मार्ग, दादाभाई नवरोजी मार्ग, महापालिका मार्ग, हजारीमल सोमाणी मार्ग, इ. मुख्य मार्गावर आणि सी.एस.एम.टि. जंक्शन, मेट्रो जंक्शन, ओ.सी.एस. जंक्शन, इ.
मुख्य चौकांमध्ये दिनांक २९/०८/२०२५ पासून अनाधिकृतरित्या उभी करण्यात आली आहेत.
सदरची सर्व वाहने उपरोक्त नमूद मुख्य मार्गावर व मुख्य चौकांमध्ये वाहतूकीच्या कोणत्याही नियमांचे पालन न करता इतस्ततः पार्क करण्यात आलेले असून त्यामुळे सदर ठिकाणच्या वाहतुकीचा पुर्ण बोजवारा उडालेला आहे. त्यामुळे दक्षिण मुंबईतील मा. मुंबई उच्च न्यायालय, सत्र न्यायालय, इतर न्यायालये, कामा हॉस्पीटल, सेंट जॉर्ज हॉस्पीटल, जी.टि. हॉस्पीटल, बॉम्बे हॉस्पीटल, मंत्रालय, विधान भवन, महाराष्ट्र / मुंबई पोलीस मुख्यालय, सी.एस.एम.टी. / चर्चगेट रेल्वे स्थानक, इ. आपात्कालीन, सेवाभूत, अत्यावश्यक, शासकीय, निमशासकीय व खाजगी संस्थामध्ये सामान्य जनतेस जाण्यापासून वंचित केले आहे.
तसेच, आंदोलकांनी उपरोक्त नमूद रस्ते व चौकांमध्ये उघड्यावर अन्न शिजवून, अर्धनग्न अवस्थेत स्नान करून, उघड्यावर शौचास बसून व लघुशंका करून, सार्वजनिक स्वास्थास बाधा निर्माण केली आहे. तसेच, त्यांनी सार्वजनिक जागेत असभ्य वर्तन देखील केलेले आहे.
आणि ज्याअर्थी, एंकदर आपण "जाहिर सभा, आंदोलने व मिरवणूका नियम, २०२५ " मधील नियम व मा. मुंबई उच्च न्यायालयाने उपरोक्त नमूद प्रकरणामध्ये दिलेले आदेश याबाबत आपणास सविस्तर माहिती असताना देखील आपण दिनांक २९/०८/२०२५ रोजी पासून आझाद मैदान, मुंबई येथे आपले आमरण उपोषण हे आंदोलन सुरू केलेले असून त्यामध्ये आपण खालील नमूद नियमांचा व आदेशांचा भंग केलेला असल्याचे दिसून येत आहे.
१) "जाहिर सभा, आंदोलने व मिरवणूका नियम, २०२५" च्या नियम क्र. १० (ड) नुसार आंदोलनात सहभागी झालेली कोणतीही व्यक्ती, आत्मदहनाचा प्रयत्न करणार नाही किंवा आत्महत्या करण्याचा प्रयत्न करणार नाही किंवा उपोषण करणार नाही.
परंतू, आपण स्वतः दिनांक २९/८/२०२५ रोजी सकाळी १०.५५ वा. पासून आमरण उपोषण सुरु केलेले आहे.
तसेच आपले आंदोलनातील एक आंदोलक श्री. तानाजी बालाजीराव पाटील, वय ३७ वर्षे, रा. नांदेड यांनी दिनांक २९/८/२०२५ रोजी १५.३५ वा.
सुमारास आंदोलनाचे स्थळ आझाद मैदान येथे आपले अंगावर रॉकेल हा ज्चलनशिल पदार्थ ओतून घेवून आत्मदहनाचा प्रयत्न केला आहे.
नमूद दोन्ही बाबी पाहता आपण सदर नियम क्र. १० (ड) चा भंग केलेला आहे.
२) सदर नियमावलीच्या नियम क. ४ (६) (च) मध्ये असे नमूद करण्यात आलेले आहे कि, कोणत्याही आंदोलनास एका वेळी फक्त एकाच दिवसासाठी परवानगी देण्यात येईल व शनिवार, रविवार व इतर शासकीय किंवा सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी कोणतीही परवानगी देण्यात येणार नाही.
त्या अनुषंगाने आपणास देण्यात आलेल्या परवानगी नुसार आपण दिनांक २९/८/२०२५ रोजी सायकांळी १८.०० वा. आपले आंदोलन स्थगित करणे अपेक्षित होते.
परंतु, आपण तसे न करता आपले आंदोलन आज दिनांक १/९/२०२५ रोजी पर्यत सुरु ठेवलेले आहे.
आपले आंदोलन सुरु ठेवण्याची परवानगी मिळण्यासाठी आपल्याकडून करण्यात आलेला अर्ज हा नियमावली मधील विहीत नमुन्यात नव्हता. तसेच, आपल्या आंदोलन कालावधीतील दिनांक ३०/०८/२०२५ व ३१/०८/२०२५ हे दोन दिवस अनुक्रमे शनिवार व रविवार होते.
त्यावरून आपण नियम क्र. ४ (६) (च) चा भंग केलेला आहे.
३) नियम क. ४ (ग) अन्वये आम्हांस प्राप्त अधिकारान्वये आम्ही परवानगी देताना आपले आंदोलनात लहान मुले, गरोदर स्त्रिया व वृध्द व्यक्तींना सहभागी केले जाणार नाही याची दक्षता घेण्याबाबत सुचित केले होते.
परंतु, आपले आंदोलनात अनेक जेष्ठ नागरिक सहभागी करण्यात आलेले आहेत.
त्यातील आंदोलनाचे स्थळ आझाद मैदान येथे एक जेष्ठ नागरीक नामे शिवाजी तुकाराम कुमरे, वय ७७ वर्षे यांनी आरक्षण देत नसल्यास मी गळफास घेवून जीव देतो असे म्हंटले होते, सदरबाबत आझाद मैदान पोलीस ठाणे येथे नोंद घेण्यात आलेली आहे.
नमूद व्यक्ती ही जेष्ठ नागरिक असून त्यांना व इतर जेष्ठ नागरीकांना आंदोलनात सहभागी करुन आपण नियम क्र ४ (ग) चा भंग केला आहे.
४) आपल्या आंदोलनाला परवानगी देताना नियम क्र. ५ नुसार असे नमूद करण्यात आलेले आहे कि, आपल्या आंदोलनातील ठराविक वाहनांना परवानगी देण्यात आलेली असून वाहतूक पोलीसांशी विचारविनिमय करुन आपल्या वाहनांनी मुंबईत प्रवेश केल्यानंतर ते ईस्टर्न फ्री वे या मार्गान वाडीबंदर जंक्शन पर्यत येतील, पुढे मुख्य आंदोलकासोबत फक्त ५ वाहने आझाद मैदान येथे जातील व इतर सर्व वाहने ही वाडीबंदर येथून पोलीसांनी निर्देशित केलेल्या शिवडी-ए शेड व कॉटनग्रीन परिसरातील नियोजित ठिकाणी पार्कीग करीता नेण्यात येतील.
आपणास दिलेल्या परवानगी पत्रात असे विवक्षित निर्देश आपणास देण्यात आलेले असताना देखील आपण दक्षिण मुंबईतील आझाद मैदान व उपरोक्त नमूद परिसरामध्ये सुमारे ५००० वाहने आणून सर्व मुख्य मार्गावर व चौका-चौकात सदर वाहने पार्क करून वाहतूक कोंडी व अडथळे निर्माण केले.
याद्वारे आपण नियम क्र. ०५ चा भंग केलेला आहे.
५) नियम क्र. ६ अन्वये आंदोलकांची कमाल संख्या हि ५००० पर्यतच ठेवणे आपणांवर बंधनकारक होते.
आझाद मैदानामधील ७००० चौरस मीटर हे क्षेत्र आंदोलनासाठी राखीव ठेवण्यात आलेले असून त्याची क्षमता ५००० पर्यत आंदोलकांनाच सामावून घेण्याएवढी आहे. तेथे त्यापेक्षा जास्त संख्येने आंदोलक आल्यास त्यांना थांबण्यासाठी मैदानात पर्याप्त जागा उपलब्ध होणार नाही, असे आपणांस कळवूनही आपण आझाद मैदान येथे सुरू केलेल्या आपल्या आंदोलनात सुमारे ४०,००० आंदोलकांचा समावेश आहे.
सदरची बाब पाहता आपण ५००० पेक्षा जास्त आंदोलक आणून नियम क्र. ०६ चा भंग केलेला आहे.
६) आपल्या सदर आंदोलनासाठी आपण अर्ज करण्यापूर्वी इतरही आंदोलकांनी दिनांक २९/८/२०२५ रोजी आंदोलनासाठी परवानगी मागितलेली होती.
त्यांचा आंदोलनाचा हक्क आबाधित ठेवण्यासाठी आंदोलकांच्या ५००० संख्येमध्ये त्यांचा देखील समावेश असेल व त्या आंदोलकांना मैदानातील पुरेशी जागा उपलब्ध करुन देणे हे आपणावर बंधनकारक आहे, असे परवानगी पत्रात आपणांस सूचित करण्यात आले होते.
परंतु, आपल्याच आंदोलनाने संपूर्ण परिसर व्यापल्याने त्या दिवशी इतर आंदोलनांना परवानगी देता आली नाही.
त्यामुळे त्यांचा आंदोलनाचा हक्क बाधित झालेला आहे.
७) नियम क. ७ नुसार विनिर्देशित केलेल्या क्षेत्राच्या दिशेने आणि क्षेत्राकडून मोर्चा नेला जाणार नाही असे स्पष्टपणे नमूद केलेले असताना देखील आपल्या आंदोलकांनी मोठ्या प्रमाणात सी.एस.एम.टि., चर्चगेट, हि रेल्वे स्थानके, बृहन्मुंबई महानगरपालिका मुख्यालय, हुतात्मा चौक, मेट्रो जंक्शन, ओ.सी.एम. जंक्शन, सी. एस. एम.टि. जंक्शन, इ. ठिकाणी आझाद आणले.
तसेच त्यांनी रस्त्यावरील वाहनांचे टपावर चढून कपडे काढून विक्षिप्त नाचकाम केले व रस्त्यावरील सिग्नल पोलवर मोर्चे नेवून रास्ता रोको केले, अश्लिल वर्तन केले, रस्त्यावर क्रिकेट कबडडी असे खेळ खेळून सार्वजनिक वाहतूकीस अडथळे चढून नारेबाजी केली.
तसेच, मुंबई शहरातील “बेस्ट'" उपक्रमातील सिटी बममध्ये घुसखोरी करून मुंबईतील नागरीकांशी उध्दट वर्तन करून भांडणे केली.
अशा प्रकारे आपल्या आंदोलकांनी आपल्या आंदोलना दरम्यान नियमबाहय कामे करून नियम क्र. ०७ चा भंग केला.
८) नियम क. ८ मध्ये नमूद असल्याप्रमाणे परवानगी घेतल्याशिवाय ध्वनीक्षेपक, सार्वजनिक प्रचार यंत्रणा किंवा गोंगाट करणारी उपकरणे यांचा वापर करता येणार नाही असे आपणास परवानगी पत्राद्वारे सूचित करण्यात आले होते.
तरी सुध्दा आपण व आपले आंदोलक यांनी अनेक ठिकाणी ध्वनीक्षेपक व गोंगाट करणारी उपकरणे, वादये याचा उपयोग विनापरवाना केलेला आहे.
आपण स्वतः आंदोलनासाठी वापरत असलेल्या ध्वनीक्षेपकाची रितसर परवानगी घेतलेली नाही. त्यावरून आपण नियम क्र. ८ चा भंग केला आहे.
९) नियम क. १० मधील आंदोलनाची वेळ सकाळी ९.०० ते सायंकाळी ६.०० वा. याच वेळेसाठी दिलेली असून त्यानंतर आपल्या आंदोलकांना मैदानात थांबता येणार नाही असे परवानगी पत्रात नमूद असतानाही आपण दिनांक २९/८/२०२५ पासून अदयाप पावेतो आंदोलन सुरु ठेवलेले असून आपण नियम क्र. १० चे उल्लघंन केलेले आहे.
१०) नियम क. ११ (ज) नुसार आंदोलनातील सहभागी व्यक्ती ही विनिर्देशित क्षेत्रात कोणतेही अन्न शिजवणार नाहीत किंवा केर-कचरा टाकणार नाहीत असे महत्त्वाचे नियम असून देखील आपले आंदोलकांनी आझाद मैदान येथे तसेच, मैदाना लगतच्या सार्वजनिक रस्त्यावर व सार्वजनिक व खाजगी ठिकाणी अन्न शिजविणे, लघुशंका करणे, आंघोळ करणे, केरकचरा करणे, इ. नियमबाहय कृत्ये करून नियम क्र ११ (ज) भंग केला आहे.
११) नियम क. ११ ( ) नुसार आंदोलनात सहभागी झालेली कोणतीही व्यक्ती वाहतूक मार्गावर व पदपथावर जमणार नाही किंवा ती अडवणार नाही.
परंतु, आपल्या आंदोलनातील आंदोलकांनी सोबत आणलेली सुमारे ५००० चारचाकी वाहने हि दक्षिण मुंबईतील आझाद मैदान, मा. उच्च न्यायालय परिसर, मंत्रालय परिसर, कुलाबा, काळबादेवी, डोंगरी, पायुधनी, वाडीबंदर, इ. परिसरात आणली व त्यातील बहुतेक वाहने ही महात्मा गांधी मार्ग, दादाभाई नवरोजी मार्ग, महापालिका मार्ग, हजारीमल सोमाणी मार्ग, इ. मुख्य मार्गावर आणि सी.एस.एम.टि. जंक्शन, मेट्रो जंक्शन, ओ.सी.एस.जंक्शन, इ. मुख्य चौकांमध्ये दिनांक २९/०८/२०२५ पासून अनाधिकृत रित्या पार्क करून ठेवलेली असून त्याद्वारे तसेच सदर रस्त्यांवर व चौकात रस्ता रोको करून, रस्त्यावर बसून, झोपून, अन्न शिजवून व इतर कृत्ये करून वेळोवेळी व सतत वाहतूक अडवलेली आहे.
त्यामुळे अनेक नागरिकांना मोठ्या प्रमाणात त्रास झालेला आहे.
मा. सर्वोच्च न्यायालयाने "अमित साहनी केस" मध्ये लोकशाही आंदोलनामुळे सामान्य जनजीवन व वाहतूक बाधित होणार नाही याची दक्षता घेण्याबाबत दिलेल्या निर्देशांचा मा. उच्च न्यायालयाने उपरोक्त नमूद प्रकरणातील आदेशामध्ये पुनरोच्चार केलेला असल्याचे आपणांस देण्यात आलेल्या परवानगी पत्रात सूचित करण्यात आले होते तरी देखील आपण व आपले आंदोलक यांनी त्याचे पालन केलेले नाही.
सबब आपण मा. सर्वोच्च व उच्च न्यायालयाच्या उपरोक्त आदेशाचे तसेच नियम क्र ११ ( ) चे देखील उल्लंघन केलेले आहे. आणि ज्याअर्थी, दिनांक ३१/०८/२०२५ रोजी आपण प्रसार माध्यमांसमोर बोलताना, "...... त्यांच्या अडमुठेपणामुळे नुसते मुंबईचे बेट जर तुमच्यावर संभाळायची वेळ आली, तर तुमच्या जिंदगीवर थुकावे लागणार. तुम्हाला फक्त मुंबईच बेट संभाळावे लागणार आहे, आजुबाजुचे सगळे नाके मराठयांनी व्यापलेले असणार आहे. हे तुम्ही, मी करून आजपर्यत दाखवलेले आहे. आणि मी जर मेलोच तर बेट सुध्दा नाही तुमचं मग. महाराष्ट्र तर नाही पण बेट सुध्दा तुमचा नाही" असे विघटनवादी वक्तव्य केले आहे.
तसेच, प्रसार माध्यमांशी बोलताना आपण आपल्या मागण्या मान्य झाल्या नाही तर, आपण महाराष्ट्रातील ५ करोड पेक्षा अधिक मराठ्यांना मुंबई शहरात आणून मुंबई मध्ये पाय ठेवायला देखील जागा शिल्लक ठेवणार नाही, अशा आशयाची धमकी दिलेली आहे.
आणि ज्याअर्थी, मा. मुंबई उच्च न्यायालयाने उपरोक्त नमूद जनहित याचिका क्र. २५६५६/२०२५ (अॅमी फॉऊंडेशन विरूध्द महाराष्ट्र राज्य व इतर) च्या दिनांक ०१/०९/२०२५ रोजीच्या सुनावणीमध्ये आपण आपल्या आंदोलना दरम्यान मा. उच्च न्यायालयाच्या आदेशांचे तसेच, आपल्या आंदोलनासाठी देण्यात आलेल्या परवानगीच्या अटी व शर्तीचे उल्लंघन केल्याबाबत खालीलप्रमाणे नोंद घेतली आहे:-
१) परिच्छेद क्र. २१ (ए)- दिनांक २६/०८/२०२५ रोजीच्या मा. उच्च न्यायालयाच्या आदेशाचे प्रतिवादी क्र. ५ ते ७ यांनी प्रथमदर्शनी उल्लंघन केलेले आहे (The Order of this court dated 26th August 2025 prima facie appears to be disobeyed by the Respondents No. 5 to 7).
२) परिच्छेद क्र. २१ (ब) - प्रतिवादी क्र. ५ ते ७ यांनी प्रथमदर्शनी त्यांना राज्य शासनाकडून देण्यात आलेल्या परवानगीतील अटी व शर्तीचे उल्लंघन केलेले असल्याने त्यांचेकडे सध्या आंदोलन सुरू ठेवण्यासाठी कोणतीही वैध परवानगी नसल्याने राज्य शासनाने पुढील कारवाई करण्यासाठी आवश्यक ती प्रक्रिया अवलंबून पुढील पावले उचलावीत (Since Respondents NO. 5, 6 & 7 have, prima facie, violated the conditions of the permissions granted to them by the State Government and since they do not have any valid permission to continue the protest on Azad Maidan, let the State Government follow the due procedure laid down in law for initiating appropriate steps).
आणि ज्या अर्थी, आपण दिनांक २९/०८/२०२५ रोजी पासून आझाद मैदान, मुंबई येथे सुरू केलेल्या आमरण उपोषण या आंदोलना दरम्यान केलेल्या उल्लंघनांमुळे व बेकायदेशीर कृत्यांमुळे मुंबई शहरात सार्वजनिक स्वास्थ, सार्वजनिक सुव्यवस्था व सार्वजनिक सुरक्षिततेस गंभीर बाधा निर्माण झाली आहे.
त्यामुळे सार्वजनिक हितासाठी अत्यावश्यक असलेल्या जीवनाश्यक वस्तु आणि सेवांचा नागरीकांना पुरवठा करण्याच्या व्यवस्थापनामध्ये अडथळे निर्माण झाले असून जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले आहे.
त्या अर्थी, आपणास यापूर्वी आंदोलन करण्यासाठी देण्यात आलेल्या परवानगीतील अटी व शर्तीचे आपण उल्लंघन केलेले असल्यामुळे तसेच, मा. मुंबई उच्च न्यायालयाने दिनांक २६/०८/२०२५ रोजीच्या त्यांच्या अंतरिम आदेशामध्ये दिलेल्या निर्देशांचे आपण उल्लंघन केलेले असल्याने, दिनांक ०१/०९/२०२५ रोजी आपण सादर केलेल्या विनंती अर्जानुसार (या पोलीस ठाण्याचे आवक क्रमांक ११३५/ /२०२५, दिनांक ०१/०९/२०२५) आपण मागितलेली आंदोलनाबाबतची परवानगी याद्वारे नाकारण्यात येत आहे.
त्यानुसार आपण आझाद मैदान परिसर लवकरात लवकर रिक्त करावा.
वरिष्ठ पोलीस निरीक्षक,
आझाद मैदान पोलीस ठाणे, मुंबई.
प्रत माहितीकरीता सविनय सादर :-
१) मा. महाअभियोक्ता, महाराष्ट्र राज्य, मुंबई
(मा. उच्च न्यायालय, मुंबई यांचे निदर्शनास आणून देण्यासाठी विनंती सह सादर)
२) मा. पोलीस सह आयुक्त (का व सु), मुंबई
३) मा. अपर पोलीस आयुक्त, दक्षिण प्रादेशिक विभाग, मुंबई
४) मा. पोलीस उप आयुक्त, परिमंडळ - १, मुंबई
५) मा. सहायक पोलीस आयुक्त, आझाद मैदान विभाग, मुंबई