डॉ. गौरी गर्जे यांच्या आत्महत्येप्रकरणी छळ आणि मानसिक त्रास दिल्याप्रकरणी पोलिसांनी गर्जे कुटुंबियांवर गुन्हा दाखल केला आहे. डॉ. गौरी यांचे पती अनंत गर्जे, नणंद शीतल गर्जे आणि दीर अजय गर्जे या तिघांवर पोलिसांनी रविवारी गुन्हा दाखल केला.
गौरीला आत्महत्येपूर्वी किरण नामक मुलीचे गर्भवती असल्याची कागदपत्र मिळाल्याने ती अस्वस्थ होती. डॉ. गौरीने संबंधित कागदपत्रे आम्हाला पाठवली होती, असा जबाबही डॉ. गौरी यांच्या वडिलांनी दिला. वरळी पोलीस ठाण्यात तिघांवर बीएनएस कलम १०८,८५, ३५२,३५१(२) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
advertisement
डॉ. गौरी यांनी टोकाचे पाऊल का उचलले?
पंकजा मुंडे अनंत गर्जे याला मुलासारख्या मानायच्या. अनंत गर्जे हे गेल्या काही वर्षांपासून पंकजा मुंडे यांचे स्वीय सहाय्यक म्हणून काम करत. गर्जे यांच्या पत्नी मुंबईतील केईएम रूग्णालयात काम करायच्या. आपल्या पतीचे दुसऱ्या मुलीबरोबर संबंध असल्याच्या संशय त्यांना होता. तसेच त्यासंबंधीचे काही पुरावे देखील त्यांच्या हाताला लागले होते. त्यामुळे नैराश्यातून त्यांनी आत्महत्या केल्याचे सांगण्यात येते.
पंकजा मुंडे काय म्हणाल्या?
दिनांक 22 नोव्हेंबर 2025 रोजी संध्याकाळी साडे सहा ते पावणे सातच्या सुमारास माझा पीए अनंतचा फोन माझ्या दुसऱ्या पीएच्या फोनवर आला. तो खूप रडत होता. पत्नीने आत्महत्या केल्याचे अत्यंत आक्रोशाने त्याने मला सांगितले. ही गोष्ट माझ्यासाठी ही खूप धक्कादायक होती. पोलिसांच्या कुठल्याही कारवाईमध्ये कसूर राहू नये आणि त्यांनी योग्य तपास करून या विषयाला हाताळावे असे माझे म्हणणे आहे, तसे मी पोलिसांना देखील सांगितले आहे. गौरीच्या वडिलांशीही मी बोलले, ते प्रचंड दु:खात आहेत हे मी समजू शकते. अश्या घटना जीवाला चटका लावून जातात आणि मनाला सुन्न करतात. कोणाच्या अति वैयक्तिक जीवनात काय चालू असतं हे अनाकलनीय आहे. अचानक धक्कादायक अशी ही घटना घडली असल्याने मलाही अस्वस्थ वाटत आहे, असे पंकजा मुंडे प्रसिद्धीपत्रकाद्वारे म्हणाल्या.
