जैन बोर्डिंगच्या भूमी विक्रीसंदर्भात मंत्री मोहोळ यांचे नाव आल्यानंतर आणि विविध आरोप झाल्यानंतर जवळपास आठ दिवसानंतर त्यांनी बोर्डिंगमध्ये जाऊन जैन मुनींची भेट घेतली. त्यासाठी जैन धर्मातील प्रतिष्ठित व्यक्तींचे फोन येऊन गेल्याचेही त्यांनी सांगितले. जैन धर्मियांच्या मागणीशी सहमत आहे. जर या प्रकरणात माझी काही चूक असती तर मी इथे आलो नसतो असे सांगून माझी बाजू मांडण्याकरिता इथे आलो नाही, असे सांगायला देखील मोहोळ विसरले नाहीत.
advertisement
धंगेकर यांचे नाव न घेता मोहोळांची टीका
मोहोळ म्हणाले, गेल्या १० १२ दिवसांत पुण्यात वेगळे राजकारण सुरू झाले आहे. जैन बांधवांनी मोर्चा काढला, आंदोलन केले त्यात माझे कधीही कुठलेही नाव घेतले नाही. राजू शेट्टी साहेबांनी माझे नाव घेतले, त्यांना राजकारण करायचे आहे. आयुष्यभर माझे नाव घ्या मला काही फरक पडत नाही. त्यांचे बघून पुण्यातले काही लोक जागे झाले आणि काहीही बोलत सुटले. त्यांचा आणि या जैन समाजाचा काही संबंध नाही. लांबून लांबून काहीच संबंध नव्हता, तरीही यांची गाडी कुठल्या कुठेच घसरली, असे प्रत्युत्तर त्यांनी रविंद्र धंगेकर यांचे नाव न घेता दिले.
व्यवहार करणारे आणि ट्रस्टी यांच्याशी बोलून मार्ग काढेन
जैन मुनींनी मला आवाहन केले होते की तुम्ही पुण्याचे खासदार आहात, या सगळ्यामध्ये तुम्ही आम्हाला पाठिंबा द्या, आंदोलनात सहभागी व्हा. यातून मार्ग काढून द्या, त्यांच्या आवाहनानंतर मी इथे आलो. या प्रकरणात माझा सहभाग असता तर त्यांनी मला बोलावलेच नसते. मी त्यांना शब्द दिला आहे की पुढच्या काही दिवसांत मी यातून मार्ग काढून देईल. मी सगळ्यांशी बोलीन, ज्यांनी व्यवहार केला किंवा जे ट्रस्टी आहेत त्यांच्याशी बोलून मार्ग काढू, असे मोहोळ म्हणाले.
घोषणाबाजी करणारे २ लोक कुणीतरी सोडलेले होते
जैन बोर्डिंगमधून बाहेर पडतावेळी काही जैन लोकांनी मोहोळ यांच्यावर प्रश्नांची सरबत्ती केली. तो व्यवहार रद्द करा असे म्हणत मोहोळ यांना घेराव घातला. जवळपास दोन चार मिनिटे चांगलाच गोंधळ उडाला होता. या घटनेवर बोलताना मोहोळ म्हणाले, मी जैन मुनींशी बोलूनच बाहेर पडलो होतो. माझी भूमिका जैन मुनींसमोर आणि सगळ्या जैन धर्मियांसमोर मांडली होती. तरीही काही जणांनी बाहेर येऊन गोंधळ घालण्याचा प्रयत्न केला. ज्या लोकांनी घोषणाबाजी केली ते २ लोक कुणीतरी सोडलेली होती, त्या लोकांनी तिथेही राजकारण केले, असे मोहोळ म्हणाले.
