गेल्या काही दिवसांपासून नागपूर तसेच मध्य प्रदेशातील सीमावर्ती भागांमध्ये लहान मुलांमध्ये अज्ञात आजाराची लक्षणे दिसून येत आहेत. आतापर्यंत मृत्यू पावलेल्या दहा मुलांपैकी सहा प्रकरणे मध्य प्रदेशातील असल्याचे समोर आले आहे. नागपूर आणि छिंदवाडा परिसरात Acute Encephalitis Syndrome (AES) या आजारासारखे रुग्ण आढळून आले असून, मृत बालकांमध्ये महाराष्ट्रातील चार मुलांचा समावेश आहे. मृत्यूमुखी पडलेल्यांचा वयोगट ० ते १६ वर्षे असा आहे. नागपूरसह शेजारील जिल्ह्यांमध्ये या प्रकरणांमुळे पालकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.
advertisement
प्रकृती बिघडल्याने रुग्णालयात दाखल
योजिता ठाकरे ही परासिया येथे राहत होती. काही दिवसांपूर्वी तिला ताप आणि अशक्तपणा जाणवू लागल्याने स्थानिक डॉक्टरांकडे उपचार करण्यात आले. मात्र प्रकृती बिघडल्याने कुटुंबीयांनी तिला नागपूर येथे आणले. लता मंगेशकर रुग्णालयात दाखल करून वैद्यकीय तपासणी करण्यात आली. डॉक्टरांनी तिच्यावर तातडीने उपचार सुरू केले. तरीही प्रकृती खालावत गेल्याने शनिवारी सकाळी तिचा मृत्यू झाला.
मृत्यूंमागील नेमके कारण अद्याप स्पष्ट नाही
दरम्यान, या मृत्यूंमागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. काही वैद्यकीय तज्ज्ञांनी हा व्हायरल संसर्गाचा प्रकार असू शकतो, असा अंदाज व्यक्त केला आहे. नागपूर व मध्य प्रदेशातील आरोग्य विभागाकडून याबाबत स्वतंत्र पथक नेमून तपास सुरू करण्यात आला आहे. मृत्यू झालेल्या मुलांचे रक्त नमुने तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठवण्यात आले आहेत.
पालकांना सावधानतेचा इशारा
आरोग्य विभागाने पालकांना सावधानतेचा इशारा दिला असून, लहान मुलांना ताप किंवा गंभीर लक्षणे दिसल्यास तात्काळ जवळच्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्याचे आवाहन केले आहे. सलग मृत्यूंच्या घटनांमुळे पालकांमध्ये चिंता वाढत आहे.