या निवडणुका नागपूर जिल्ह्यात महायुती आणि महाविकास आघाडी स्वतंत्रपणे लढवत असल्याने बहुतांश ठिकाणी बहुरंगी लढती पाहायला मिळाल्या. मात्र प्रत्यक्षात मुख्य सामना हा काँग्रेस आणि भाजप यांच्यातच रंगला. काही नगरपालिकांमध्ये भाजपला शिंदे गटाच्या शिवसेनेचा सामना करावा लागला, तर काही ठिकाणी अजित पवार गटाच्या राष्ट्रवादी काँग्रेसविरुद्ध थेट लढत झाली.
निवडणुकीच्या सुरुवातीपासूनच भाजपने ‘एकला चलो’ची भूमिका घेतली होती. संपूर्ण जिल्ह्यात आपले वर्चस्व प्रस्थापित करण्याचा पक्षाचा उद्देश होता आणि निकालांनी त्या रणनीतीला यश मिळाल्याचे स्पष्ट झाले आहे. भाजपचे नगराध्यक्ष कामठी, सावनेर, उमरेड, खापा, वाडी, कळमेश्वरसह इतर पालिकांमध्ये निवडून आले आहेत. काटोल नगरपालिकेत शरद पवार गटाच्या राष्ट्रवादी काँग्रेसला अध्यक्षपद मिळाले, तर रामटेकमध्ये शिवसेनेने आपला गड राखण्यात यश मिळवले. विशेष म्हणजे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या कामठी नगरपालिकेत भाजपला प्रथमच विजय मिळाला आहे.
advertisement
कामठीतील विजयामागे दलित आणि मुस्लिम मतांतील विभागणीची भूमिका निर्णायक ठरल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे भाजपचा विजय झाला असला, तरी पक्षाविरोधात जनमत अस्तित्वात असल्याचेही या निकालांतून दिसून आले. सावनेर नगरपालिकेतही काँग्रेस नेते सुनील केदार यांना पुन्हा एकदा धक्का देण्यात भाजपला यश आले आहे.
मुख्यमंत्र्यांचा ‘रिपोर्ट कार्ड’
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या राजकीय नेतृत्वासाठी हे निकाल महत्त्वाचा टर्निंग पॉइंट ठरतात. स्वतःच्या जिल्ह्यात १५ पैकी १२ नगरपालिकांमध्ये भाजपचा झेंडा फडकणे म्हणजे केवळ निवडणूक विजय नाही, तर संघटनात्मक ताकद, रणनीती आणि स्थानिक पकड यांना मिळालेली थेट जनमान्यता आहे. तिरंगी लढती, स्वतंत्र आघाड्या आणि तीव्र स्पर्धा असूनही भाजपने आघाडी घेतल्याने ‘एकला चलो’चा प्रयोग नागपूर जिल्ह्यात यशस्वी ठरल्याचे या निकालांतून ठळकपणे समोर आले आहे. हे यश फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील भाजपसाठी एक मजबूत राजकीय रिपोर्ट कार्ड ठरत आहे.
