नागपूर : विधानसभा निवडणुकीसाठी जागा वाटपाच्या चर्चा अंतिम टप्प्यात आल्या असताना आणि आता उमेदवारांची यादी कधी येतेय याची प्रतीक्षा असतानाच महाविकास आघाडीत वादाची ठिणगी पटली आहे. शिवसेना ठाकरे गटाचे नेते संजय राऊत आणि काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यात वादाची शाब्दिक वॉर सुरू आहे. संजय राऊत यांनी राज्यातील काँग्रेसची दिल्लीत तक्रार केलीय. यावरून काँग्रेसची ठाकरे गटाबाबत नाराजी असल्याच्या चर्चा आहेत. एका बाजूला वाद सुरू असताना आता नागपुरात काँग्रेसच्या गुप्त बैठका सुरू असल्याची माहिती समोर येतेय.
advertisement
लोकसभा निवडणुकीत काँग्रेसच्या सांगली पॅटर्नची चर्चा जोरात झाली होती. सांगलीत काँग्रेसने तिकिट न दिल्यानं नाराज उमेदवाराने बंडखोरी करत निवडणूक लढवली आणि जिंकली होती. तशीच चाचपणी नागपुरात करण्यासाठी काँग्रेसच्या गुप्त बैठका सुरू आहेत. पवार गट पूर्व नागपूर आणि ठाकरे गट दक्षिण नागपूर काँग्रेससाठी सोडण्यास तयार नाहीत. त्यामुळे काँग्रेसचे कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत.
दरम्यान, संजय राऊत यांनी मविआत जागावाटपावरून नाराजी आणि वाद नसल्याचं सांगण्यात आलं आहे. तर नाना पटोले यांनी म्हटलं की, काँग्रेसचे निर्णय हायकमांड घेते आणि रमेश चेन्नीथला, शरद पवार यांची भेट होणार आहे. कोणामध्ये वाद होण्याचा प्रश्नच नाही.
पूर्व नागपूर, दक्षिण नागपूर मतदारसंघात काल रात्री उशीरापर्यंत कॅाग्रेस पदाधिकाऱ्यांच्या बैठका झाल्या. पूर्व नागपूरात शरद पवार गटाची ताकद नाही, एक नगरसेवकही नाही. कोणत्याही परिस्थिती नागपूरातील सहापैकी एकही जागा काँग्रेस मित्रपक्षाला सोडायला तयार नाही. शरद पवार गटाला गेल्यास सांगली पॅटर्न आणि राजीनाम्याबाबत पदाधिकाऱ्यांची चर्चा झाली. या बैठकीला काँग्रेस नेते अभिजित वंजारी आणि संगीता तलमले उपस्थित होते. दोन्ही मतदारसंघ ठाकरे गट आणि शरद पवार गटाकडे गेल्यास नागपूरात सांगली पॅटर्नची शक्यता व्यक्त केली जातेय.
