नागपूर : रामकृष्ण मठाचे माजी अध्यक्ष स्वामी ब्रह्मस्थानंद यांचं निधन झालं. नागपूरमध्ये त्यांनी अखेरचा श्वास घेतला. रामकृष्ण मिशन नागपूरचे अध्यक्ष म्हणून त्यांनी अनेक वर्षे काम पाहिलं होतं. स्वामी ब्रह्मस्थानंद यांच्या निधनानंतर विविध क्षेत्रातील मान्यवरांनी शोक व्यक्त केला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वामी ब्रह्मस्थानंद यांना श्रद्धांजली वाहिली.
स्वामी ब्रह्मस्थानंद जून 1971 मध्ये नागपूर येथे रामकृष्ण मठात सहभागी झाले. त्यांना 1982 मध्ये संन्यास देण्यात आला. यानंतर त्यांनी नागपूर मठ आणि हैदराबाद मठ येथे विविध पदांवर काम केले. मार्च १९९६ पासून ते रामकृष्ण मठ, नागपूरचे अध्यक्ष म्हणून काम बघत होते.
advertisement
रामकृष्ण मठ नागपूरचे माजी अध्यक्ष श्री स्वामी ब्रह्मस्थानंदजी महाराज यांच्या निधनाची बातमी ऐकून अत्यंत दु:ख झाले. पूज्य श्री रामकृष्ण परमहंस, स्वामी विवेकानंद यांची शिकवण लाखो लोकांपर्यंत नेण्यात त्यांनी मोलाची भूमिका बजावली आणि अनेकांचे आयुष्य प्रकाशित केलं. रामकृष्ण मिशनसाठी त्यांनी केलेले कार्य सदैव स्मरणात राहील. माझे प्रणाम आणि विनम्र श्रद्धांजली अशा शब्दात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वामी ब्रह्मस्थानंदजी यांना श्रद्धांजली वाहिली.