नगरपालिका निवडणुकांना डोळ्यासमोर ठेवून वंचित आणि काँग्रेसच्या नेत्यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेऊन युतीची घोषणा केली होती. मात्र निवडणुकीपूर्वीच काँग्रेस आणि वंचितची युती तुटली आहे. समान जागा वाटपाचे धोरण ठरले होते. मात्र १३ नगर परिषदेत पावणे तीनशे जागांपैकी काँग्रेसने फक्त चार जागा दिल्याचे सांगत आमची किमान २५ जागांची मागणी होती, असे वंचितने स्पष्ट केले.
advertisement
नांदेडचे काँग्रेस खासदार रविंद्र चव्हाण भाजपसाठी काम करतात- अविनाश भोसीकर
काँग्रेसने आम्हाला चार जागा देऊन आमच्या पाठीत खंजीर खुपसला, असा आरोप वंचितचे निवडणूक समन्वयक अविनाश भोसीकर यांनी केला. तसेच नांदेडचे काँग्रेस खासदार रविंद्र चव्हाण हे भारतीय जनता पक्षासाठी काम करत असल्याचा आरोपही त्यांनी केला.
नांदेडची काँग्रेस ही भाजपाची बी टीम, वंचितचा गंभीर आरोप
भाजपा नेते अशोक चव्हाण यांना फायदा व्हावा म्हणून काँग्रेसचे खासदार रविंद्र चव्हाण यांनी कमी जागा देऊन वंचित सोबतची युती तोडली. नांदेडची काँग्रेस ही भाजपाची बी टीम असल्याचे अविनाश भोसीकर म्हणाले. विशेष म्हणजे राज्यात सर्वप्रथम नांदेडमध्ये काँग्रेस आणि वंचितची युती झाली होती. मात्र निवडणुकीपूर्वीच दोन्ही पक्षात काडीमोड झाला आहे.
