शेख अब्बास शेख रमजानसाब असं अटक केलेल्या आरोपीचं नाव आहे. तर झिशान लतीफ सय्यद असं हत्या झालेल्या १७ वर्षीय तरुणाचं नाव आहे. तो मुखेड तालुक्यातील डोंगरगाव येथील रहिवासी होता. बायकोवर वाईट नजर असल्याच्या संशयातून आरोपीने झिशानची हत्या केल्याची प्राथमिक माहिती आहे.
नेमकं प्रकरण काय?
मिळालेल्या माहितीनुसार, डोंगरगाव येथील शेख अब्बास शेख रमजानसाब आणि त्याच गावातील सय्यद झिशान सय्यद लतीफ हे दोघे मित्र होते. सय्यद झिशान हा बारावीचे शिक्षण घेत होता. दोघंही मित्र असल्याने त्यांचं दोघांच्या घरी येणं-जाणं होतं. पण मागील काही काळापासून झिशानची आपल्या बायकोवर वाईट नजर आहे, असा संशय अब्बास याला होता.
advertisement
'माझ्या बायकोवर तुझी वाईट नजर'
याच कारणातून मोहरमच्या दिवशी या दोघांमध्ये भांडण झाले होते, नंतर त्यांच्यातला वाद मिटला होता. १ ऑक्टोबरला शेख अब्बासने सय्यद झिशानला सोबत नेल्याचे अनेकांनी पाहिले. त्यानंतर सय्यद झिशान घरी आला नव्हता. मृताच्या कुटुंबीयांनी शेख अब्बासकडे विचारणा केल्यावर त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली. २ ऑक्टोरला सकाळी झिशानचे वडील सय्यद लतीफ हे मुखेड पोलीस ठाण्यात गेले. त्या वेळी गडग्याजवळ युवकाचा मृतदेह सापडला, असे पोलिसांनी त्यांना सांगितले, तसेच मृताचे फोटोही दाखवले. फोटोवरून झिशानच्या वडिलांनी त्याची ओळख पटवली.
'घटनास्थळी आढळल्या दारुच्या बाटल्या'
घटनास्थळी चप्पल, दगड आणि दारूच्या बाटल्या आढळल्या. संशयित शेख अब्बास याने झिशानला पार्टीसाठी नेले. इथं त्याने झिशानच्या छातीवर चाकूने वार केला. नंतर झिशान कोसळताच त्याच्या डोक्यात दगड घातला. नंतर दुचाकीचे पेट्रोल काढून झिशानचा मृतदेह जाळण्याचा प्रयत्न केल्याचेही समोर येत आहे. संशयिताने गुन्ह्याची कबुली दिली आहे. घटनेचा पुढील तपास केला जात आहे.